महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ
इचलकरंजी:
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धा २०२४-२५ अंतिम फेरीचा उदघाटन समारंभ येथे उत्साहात संपन्न झाला. येथील महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक ओमप्रकाश दिवटे, सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबईचे प्रतिनिधी गणेश अडसूळ आणि नाट्य परिषद इचलकरंजी शाखेचे अध्यक्ष डॉ. एस. पी. मर्दा यांच्या हस्ते नटराज प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना यावेळी दिवटे यांनी “आजच्या धावपळीच्या जगात समृद्धपणे जीवन जगण्यासाठी संगीत व नाट्यकला या आवश्यक गोष्टी आहेत. यामध्ये संगीत नाटक ही अधिक कौशल्याची गोष्ट आहे कारण यामध्ये अभिनय, सादरीकरण, संवाद आणि उच्चार याबरोबरच सूर आणि तालाचे भान ठेवावे लागते” अशा प्रकारचे उदगार काढले. त्यापूर्वी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना मर्दा यांनी “जगण्यासाठी केवळ पैसे मिळविणे ही गोष्ट महत्त्वाची नाही तर एखादी तरी कला येणे, कलेची आवड असणे महत्त्वाचे आहे. तसे असेल तर आपण अधिक चांगल्या प्रकारे जगण्याची वाटचाल करू शकतो” अशा आशयाचे प्रतिपादन केले
यावेळी व्यासपीठावर सौ. मंगला आपटे पुणे, दीपक कलढोणे सोलापूर, राजेंद्र फडते गोवा, संजय जोशी नांदेड आणि वसंत दातार, पुणे हे महाराष्ट्राच्या विविध भागातील अनुभवी रंगकर्मी परीक्षक म्हणून उपस्थित होते. उदघाटन कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक राष्ट्रगीत व राज्य गीताने करण्यात आली. यावेळी गणेश अडसूळ यांच्या हस्ते सर्व परीक्षकांना पुस्तक भेट देण्यात आले तर स्पर्धेचे समन्वयक श्रीनिवास फाटक यांच्या हस्ते पाहुण्यांना गुलाबपुष्प प्रदान करण्यात आले. उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित ढवळे यांनी केले तर शेवटी नाट्य परिषद शाखेचे प्रमुख कार्यवाह संजय होगाडे यांनी आभार व्यक्त केले. स्पर्धेचे सहसमन्वयक या नात्याने सचिन चौधरी, कपिल पिसे आणि संतोष आबाळे हे काम पाहात आहेत तर नाट्य परिषद इचलकरंजी शाखा स्पर्धेच्या स्थानिक संयोजनात सहभागी आहे.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी श्री दाडोबा क्रिएशन मोरजीम, गोवा या संस्थेने ‘संगीत कधीतरी कोठेतरी’ हे नाटक चांगल्या प्रकारे सादर करून रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळविली. लेखन वसंत कानेटकर यांचे होते तर दिग्दर्शन अनिल असोलकर यांनी केले होते. नाटकाचे संगीत, गायन, अभिनय या सर्व गोष्टी चांगल्या जमलेल्या होत्या तर नेपथ्य, प्रकाश योजना या बाबीही उल्लेखनीय होत्या.
येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात सदरची स्पर्धा सुरू झाली असून १० फेब्रुवारीपर्यंत दररोज सायंकाळी ७ वाजता नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. महाराष्ट्र आणि गोवा येथील नामवंत संघांची नाटके स्पर्धेत सादर होणार आहेत.
फोटो-राज्य संगीत नाट्य स्पर्धेचे उदघाटन करताना आयुक्त दिवटे, अडसूळ, डॉ. मर्दा आणि परीक्षक

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800