इचलकरंजीत जर्मन टोळीविरोधात गुन्हा दाखल; बंदी आदेशाचा भंग करून केक कापला
इचलकरंजी
येथील महासत्ता चौक येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचे उल्लंघन करून रस्त्यावर टेबल लावून केक कापणाऱ्या जर्मन टोळीतील चार जणांविरुद्ध इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस हवालदार अनिल बबन पाटील (नेमणूक – इचलकरंजी पोलीस ठाणे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून, आरोपी रुपेश पंडीत नरवाडे (वय २४, रा. दत्तनगर, कबनूर), गौरव वसंत मरडे (वय २४, रा. दत्तनगर, कबनूर), ओमकार सुनिल धांतुडे (वय २२ रा. गावभाग, इचलकरंजी) आणि द्वारकाधीश खंडेलवाल (वय २५, रा. इचलकरंजी) यांनी १६ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० च्या सुमारास शांतीनिकेतन शाळेसमोरील महासत्ता चौकात जमून रस्त्यावर टेबल लावून केक कापला.
कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिनांक ८ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमवण्यास बंदी आदेश लागू केला होता. तरीदेखील, आरोपींनी हा आदेश न मानता सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण केला. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यापूर्वीही या आरोपींवर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास सहायक फौजदार ननवरे करीत आहेत.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800