“तुझं आहे तुजपाशी” या नाटकाचे अभिवाचन संपन्न
इचलकरंजी:
पुलंच्या प्रतिभेतून निर्माण झालेल्या तुझे आहे तुजपाशी या अजरामर नाटकाच्या अभिवाचनाने श्रोत्यांची मने जिंकली.
येथील आपटे वाचन मंदिराने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बुधवार दि. ५ मे २०२५ रोजी अभिवाचनाचा कार्यक्रम ग्रंथालयाच्या बजाज सभागृहामध्ये आयोजित केला होता. कवी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस डॉ. अशोक सौंदत्तीकर व डॉ. श्रीवल्लभ मर्दा यांच्या हस्ते पुष्पहार घालून कार्यक्रमास सुरुवात झाली.
तुझे आहे तुजपाशी या नाटकाच्या निवडक प्रवेशातील बहारदार संवादांचे अभिवाचन ग्रंथालयाच्या मन संचालकांनी केले. डॉ. सतिश, शाम आणि काकाजींच्या भूमिकेचे अभिवाचन श्री. संजय सातपुते आणि डॉ. सुजित सौंदत्तीकर यांनी अत्यंत तडफदारपणे करुन श्रोत्यांची वाहवा मिळविली. उषा आणि गीताची दुहेरी भूमिका सौ. मिनाक्षी तंगडी यांनी अत्यंत कौशल्याने आणि प्रभावीपणे वठवून श्रोत्यांची दाद मिळविली. तर श्री. अशोक केसरकर यांनी आचार्य पोफळे गुरुजींच्या भूमिकेशी समरस होऊन केलेल्या अभिवाचनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. तासभराच्या या छोटेखानी कार्यक्रमाने पुलंच्या स्मृती जागवून मराठी भाषा गौरव दिन आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरा केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालयाच्या अध्यक्ष सौ. सुषमा दातार यांनी केले व आभार प्रदर्शन कार्यवाह कु. माया कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमास ग्रंथालयाचे संचालक तसेच शहरातील प्रतिष्ठित, बंधू-भगिनी आणि रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800