स्व.मल्हारपंत बावचकर (मामा) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कोल्हापूर जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचा दिमाखात शुभारंभ.
इचलकरंजी:
कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि जयहिंद मंडळाच्या वतीने मंडळाचे संस्थापक संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू स्व. मल्हारपंत बावचकर (मामा) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कोल्हापूर जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचा दिमाखात शुभारंभ करण्यात आला. या स्पर्धेत पुरुष गटातील 30 आणि महिला गटातील 8 संघ सहभागी झाले आहेत. पहिल्याच दिवशी शिवशाहू चिखली आणि शाहू सडोली या संघांनी विजयी सलामी दिली.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व कै. बावचकर मामांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर स्पर्धेचा शुभारंभ आंतरराष्ट्रीय खेळाडू सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे व माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते मैदानाचे पुजन करुन करण्यात आले. जयहिंद मंडळाचे अध्यक्ष सतिश डाळ्या यांनी स्वागत तर शंकर पोवार यांनी प्रास्ताविक केले. कार्याध्यक्ष उदय चव्हाण यांनी जयहिंद मंडळाच्या कार्याचा आढावा घेत कै. बावचकर मामांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी माजी वस्त्राद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी, औद्योगिक क्षेत्रात प्रगती व क्रीडा क्षेत्रात उन्नती साधत वस्त्रनगरीचे नांव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकत आहे. त्याला सर्वांनी मिळून आणखीन उंचावर नेऊया असे सांगत जयहिंद मंडळाच्या विकासासाठी लागेल ते सहकार्य करु अशी ग्वाही दिली.
येथील जयहिंद मंडळाच्या क्रीडांगणावर तयार करण्यात आलेल्या चार मैदानावर ही स्पर्धा खेळली जात आहे. पहिल्याच दिवशी अटीतटीचे व रोमहर्षक सामने पाहण्यास मिळाले. सायंकाळी 4 ते रात्री 10 या वेळेत सामने सुरु असून एकाच वेळी 5 हजार प्रेक्षक बसू शकतील अशी बैठक गॅलरीची व्यवस्था केली आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर इचलकरंजीकरांना कबड्डीतील थरार व चुरस पाहण्यास मिळाली. बाद पध्दतीने तीन दिवस ही स्पर्धा चालणार असून रविवारी उपांत्य आणि अंतिम सामने खेळले जातील. त्यानंतर बक्षिस समारंभ संपन्न होईल. सूत्रसंचालन अमित कागले यांनी केले. आभार शशांक बावचकर यांनी मानले.
महालक्ष्मी पेठवडगांव विरुध्द शाहू सडोली यांच्यातील पहिलाच सामना अत्यंत अटीतटीचा व चुरशीचा झाला. दोन्ही संघातील खेळाडूंच्या आक्रमक खेळीने निर्धारीत वेळेत हा सामना बरोबरीत राहिला. त्यामुळे त्यांना पुन्हा प्रत्येकी पाच रेड (चढाया) देण्यात आले. त्यामध्ये अवघ्या 1 गुणांनी शाहू सडोली संघाने विजय मिळविला. तर एस. एम. जोशी कोल्हापूर विरुध्द शिवशाहू चिखली यांच्यातील सामन्यात पहिल्यापासूनच शिवशाहू संघाने वर्चस्व राखले होते. हा सामना अखेर 9 गुणांनी शिवशाहू संघाने जिंकला. रात्री उशीरापर्यंत उर्वरीत सामनेही अत्यंत अटीतटीचे झाले.
याप्रसंगी मंडळाचे सेक्रेटरी दिलीप ढोकळे, जयवंत लायकर, प्रकाश दत्तवाडे, सुनिल पाटील, डी. एन. कौंदाडे, राहुल खंजिरे, भालचंद्र उत्तुरकर, अजितमामा जाधव, श्रृती जमदग्नी, श्रध्दा बाळण्णावर, समीर बाळण्णावर, रमेश भेंडीगिरी, आण्णासाहेब गावडे, शेखर शहा, बजरंग वडींगे, अमृत भोसले, नंदु पाटील, अहमद मुजावर, नरसिंह पारीक, अनिल डाळ्या, सदा मलाबादे, प्रविण फाटक, राजेश रजपुते, नागेश भोसले, सुनिल सुतके, शशिकांत पाटील, राजेंद्र चौगुले, रुपेश जाधव, बाबासाहेब कोतवाल, सदाशिव कित्तुरे, सतिश मेटे, सुहास गोरे आदींसह क्रीडारसिक उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800