नागरी वस्तीतील एकाही घराला व क्रीडांगणाला आरक्षणाचा फटका बसणार नाही-आयुक्त पल्लवी पाटील
इचलकरंजी:
लोकवस्तीच्या ठिकाणी पडलेल्या आरक्षण संदर्भात माहिती घेऊन येथे वास्तव्यास असलेल्या एकाही घराला कसलीही अडचण होऊ देणार नाही. त्यानंतर याच परिसरातील क्रीडांगणाच्या ठिकाणचे आरक्षण कसे काढता येईल या संदर्भातही चर्चा करुन ते क्रीडांगणच राहिल याचा निर्णय घेऊ, अशी ग्वाही आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिली. तर चुकीच्या पध्दतीने टाकण्यात आलेले आरक्षण त्वरीत रद्द करावे अन्यथा शहरातील महानगरपालिकेसह शहरातील प्रत्येक मुख्य चौकात क्रिकेटसह विविध खेळ खेळत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी नगरसेवक राजू बोंद्रे यांनी दिला आहे.
महानगरपालिकेच्या नव्या प्रारुप विकास आराखड्यात प्रभाग क्रमांक 10 मधील गट नं. 78 याठिकाणी लोकवस्तीच्या ठिकाणी क्रीडांगण आणि गट नं. 117 या क्रीडांगणाच्या ठिकाणी पडलेले अन्य आरक्षण चुकीचे असून ते रद्द करावे या मागणीसाठी राजू बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली सहा महिन्यांपूर्वी हे आरक्षण रद्द करण्यात यावे यासाठी महानगरपालिकेवर मोर्चा काढत प्रशासनाचा निषेध नोंदवत ठिय्या आंदोलन केले होते. याच प्रश्नासंदर्भात मागील आठवड्यात भागातील नागरिकांनी आयुक्त पल्लवी पाटील यांची भेट घेऊन आरक्षण रद्दची मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने आयुक्त पल्लवी पाटील यांनी बुधवारी प्रत्यक्ष जागांवर भेट देत पाहणी करत माहिती जाणून घेतली. सोबत नगगररचना विभागाचे अधिकारी प्रशांत भोसले, श्री. देसाई उपस्थित होते.
यावेळी राजू बोंद्रे यांनी, याठिकाणी अनेक वर्षांपासून 200 कुटुंबे वास्तव्यास आहेत. सर्वचजण नियमित घरफाळा, पाणीपट्टी सर्व कर भरतात. परंतु महानगरपालिकेच्या नव्या प्रारुप विकास आराखड्यात चुकीच्या पध्दतीने आरक्षण टाकले असून ते रद्द न झाल्यास नागरिकांसह खेळाडूंवर अन्याय होणार आहे. कष्टाने उभारलेले घरकुल उद्ध्वस्त झाल्यास नागरिकांवर बेघर होण्याची वेळ येईल. तर भागात असलेले मैदान अन्य कारणांसाठी वापरल्यास भागातील खेळाडूंवरही अन्याय होणार असल्याने लवकरात लवकर चुकीचे आरक्षण रद्द करावे अशी मागणी केली.
आयुक्त पाटील यांनी पाहणी केल्यानंतर आपण सविस्तर माहिती घेऊन लोकवस्ती असलेल्या जागेवरील कुटुंबांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. तसेच खेळाचे मैदान हे खेळासाठीच राहिल याची पूर्णत: दक्षता घेऊनच निर्णय घेऊ, अशी ग्वाही यावेळी दिली. याप्रसंगी सतीश मुळीक, सुबोध कोळी, मोहन काळे, शाबाज मुक्केरी, भास्कर भांदिगरे, राजदीप सनगर, दिलीप शिंदे, सौरभ धुमाळ, इलाई मुजावर, दीपक पोवार, मेहबूब शेख, विदेश हजारे, संतोष पाटील, विनोद स्वामी, बाळू रोड्डे, आरिफ मकानदार यांच्यासह भागातील महिला, खेळाडू आणि विविध क्रिकेट संघटनांचे खेळाडू उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800