खंडणीसाठी धमकी, घरात घुसून तलवारीने दहशत – नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.
इचलकरंजी:
बांधकामासाठी खंडणी मागणे आणि पोलिस तपासात पंच म्हणून सही केल्याच्या रागातून घरात घुसून तलवारी व कोयत्याने दहशत माजवणाऱ्या नऊ जणांविरोधात इचलकरंजी पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दत्ता उत्तरेश्वर शेंडगे (वय ४५, व्यवसाय – कॉन्ट्रॅक्टर, रा. सहकारनगर, साईट नं. १०२ इचलकरंजी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी बच्चन उर्फ राजकुमार कांबळे, सुमित बच्चन कांबळे, पृथ्वीराज उर्फ भैय्या कांबळे, बालाजी कांबळे, स्वप्निल तारळेकर, अर्जुन भोसले, ओंकार धमनगे, यश निबांळकर आणि ऋतीक गवळी (सर्व रा. सहकारनगर, इचलकरंजी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शेंडगे हे बांधकाम कंत्राटदार असून,१६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता समाज मंदिर कंपाऊंड आणि तुळजा भवानी सभामंडपाचे बांधकाम सुरू ठेवण्यासाठी बच्चन कांबळे याने त्यांच्याकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागितली व पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
यानंतर, १६ मार्च २०२५ रोजी रात्री ११ वाजता, इचलकरंजी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासात फिर्यादी यांनी पंच म्हणून सही केल्याचा राग आरोपींनी मनात धरला. त्या रात्री आरोपींनी जमाव करून शेंडगे यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला.यावेळी पृथ्वीराज कांबळे याच्या हातात तलवार,तर बालाजी कांबळे याच्या हातात कोयता होता.सर्वांनी मिळून फिर्यादीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी फिर्यादीने पोलिसांत तक्रार दिली असून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्य आरोपी बच्चन कांबळेवर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच, अन्य आरोपींवरही विविध गुन्हे नोंद आहेत.या प्रकरणाचा पुढील तपास पो.नि. महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करत आहेत.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800