काव्यसंध्या २०२५ काव्यसंमेलनाने केले रसिकांना मंत्रमुग्ध
इचलकरंजी :
श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात भरलेल्या ‘काव्यसंध्या 2025’ या राज्यस्तरीय युवा कवीसंमेलनात कवींच्या शब्दांनी समाजातील विविध विषयांना सशक्त आवाज दिला. प्रेम, सामाजिक संघर्ष, विचारस्वातंत्र्य, आणि स्त्री-स्वातंत्र्य यांसारख्या विषयांना कवितेतून धार आली. रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हे काव्यसंमेलन एका अविस्मरणीय अनुभवात परिवर्तित झाले.
डीकेएएससी कॉलेज, सृजन सह्याद्री फौंडेशन, प्रतिरंग प्रोडक्शन लोकराजा ऊर्जामैत्री काव्यांगण परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहात या कवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.या बहारदार संमेलनात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले प्रतिभावंत कवी आपल्या शब्दसंपदेने रंगत आणत होते. अनंत राऊत (अकोला), रोहित शिंगे (इचलकरंजी), उमेश सुतार (कोल्हापूर), डॉ. स्वप्नील चौधरी (सोयगाव), विश्वास पाटील (राधानगरी), रोहिणी कदम (मुंबई), गुंजन पाटील (जळगाव) आणि विशाल मोहिते (बुलढाणा) या नामवंत कवींनी आपल्या प्रभावी रचना सादर करत रसिकांना वेड लावले.
डॉ. स्वप्नील चौधरी यांनी निसर्ग, बायको, चला दंगल समजून घेऊ, संविधानाचे गाणं गाऊ आदी कवितेद्वारे वेगळा दृष्टिकोन मांडला. समाज आणि कुटुंब यांचा सूक्ष्म विचार त्यांच्या कवितांमध्ये प्रकर्षाने जाणवला. विशाल मोहिते यांनी आपल्या गझलांनी संमेलनाला एक वेगळीच उंची दिली. “मनात माझ्या एक पुराणी आठवण आली… फलाट वरती तुझ्या गावची गाडी आली…” या ओळींनी प्रत्येकाला आपल्या आठवणींच्या दुनियेत नेले. तसेच “आधी आजी सांगत होती साऱ्या गोष्टी…. नंतर साऱ्या गोष्टीमधी आजी आली…” या भावस्पर्शी ओळींनी रसिकांची उत्तम दाद घेतली. अनंत राऊत यांनी विनोदी अंगाने जाणाऱ्या कवितेने संपूर्ण सभागृह हास्यकल्लोळात बुडवले. तर त्यांच्या “जीवाची वात केल्यावर दिवा होऊन लखलखलो, जगाचा वेग माझ्या मनाला भावला नाही” या ओळींनी अंतर्मुख केले.
रोहिणी कदम यांनी “सिद्ध करतो सिद्धता आपली, पण शूद्र देतो दाखले आपले” या ओळींमधून समाजातील कटू वास्तव मांडले. तर त्यांची “गंध फुलांना असतो कारण अत्तर मातीत असते, स्वार्थ असतो खोलवर बाकी सगळं वरवर असते” ही कविता रसिकांनी उचलून धरली. उमेश सुतार यांनी ‘येथे जळते ज्यांचे घर त्याच्याच घराला घाव आहे… हिंमत कर दोस्ता आता आपल्या हातात डाव आहे अशा प्रभावी ओळींमधून जीवनसंघर्षाची कथा उलगडली.
गुंजन पाटील यांनी ‘या मुलींना सार कळत, मला आई व्हायचं नाही.’ या ओळींमधून स्त्री स्वातंत्र्याच्या लढ्याचा वेध घेतला, तर विश्वास पाटील यांनी “तू गेल्यावर या श्वासांचं काय करू… सांग गुलाबा या काट्यांचं काय करू” अशा गझलेतून संवेदनशील भावनांना वाट मोकळी करून दिली. विशेषतः ‘ दाभोलकर अन् पानसरेही जिवंत अजूनही, पिस्तूल म्हंटले या गोळ्यांचे काय करू ‘ या ओळींनी उपस्थितांमध्ये चिंतनाची ठिणगी पेटवली. समाजात वाढणारा कट्टरतावाद आणि मानवी विचारस्वातंत्र्याचा संघर्ष कवितेतून प्रकर्षाने व्यक्त झाला.या काव्यसंध्येने विचारप्रवृत्त करणारा ठसा उमटवला. सुरेख व प्रभावी निवेदन रोहित शिंगे यांनी केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे होते. मदन कारंडे, प्राचार्य डॉ. एस एम मणेर, प्राचार्य डॉ. अनिल पाटील, पोलीस उपाधीक्षक अरविंद रायबोले, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ, ॲड. सचिन माने, दशरथ माने, नितीन धूत, मेजर मोहन वीरकर, लेफ्टनंट प्रा. विनायक भोई आदींची प्रमुख उपस्थिती होती. आभार प्रतीक साठे यांनी मानले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन अक्षय इळके यांनी केले. हे काव्य संमेलन यशस्वी होण्यासाठी सारंग भांबुरे, अंकुश पोळ, निखिल करोशी, दिग्विजय म्हामने, जयेश कार्वेकर, अविष्कार कांबळे, विपुल कांबळे, विनय लंबे, सुनील दळवी, दिग्विज देसाई यांनी परिश्रम घेतले.
—-
मंत्रमुग्ध करणारा काव्यजागर
प्रा. रोहित शिंगे संकल्पनेतून साकारलेल्या कवीसंमेलनात रसिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने संपूर्ण सभागृह भारावून गेले होते. कवितांच्या विविध छटांनी, भावना आणि विचारांच्या सुरेख गुंफणीमुळे प्रत्येक रसिकाने शब्दांचा हा अमूल्य ठेवा आपल्या हृदयात साठवला. शब्द, सूर आणि भावनांचा संगम असलेल्या या कवीसंमेलनाने रसिकांच्या मनात घर केले. कवितांचे हे स्वरूप, शब्दांचे वजन आणि त्यातील हळुवार भावना अनुभवताना उपस्थितांनी कवितेच्या विश्वात रममाण होण्याचा आनंद घेतला. या साहित्यिक सोहळ्याने इचलकरंजीकरांना एक अविस्मरणीय सांस्कृतिक पर्वणी दिली.
फोटो
काव्यसंध्या २०२५ मध्ये सादरीकरण करताना कवी समोर उपस्थित जनसमुदाय

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800