राज्यात ‘जिवंत सातबारा’ मोहिमेला सुरुवात,मृत खातेदारांच्या वारसांची नोंद ७/१२ उताऱ्यावर होणार, शेतकऱ्यांना दिलासा- प्रांताधिकारी मोसमी चौगुले
इचलकरंजी:
राज्य सरकारच्या १०० दिवस कृती आराखड्यांतर्गत महसूल विभागाने “जिवंत सातबारा” ही महत्त्वाकांक्षी मोहिम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. या मोहिमेअंतर्गत गावातील सर्व मृत खातेदारांच्या वारसांची नोंद ७/१२ उताऱ्यावर करण्यात येणार असून,यामुळे शेतकऱ्यांना व नागरिकांना जमिनीशी संबंधित व्यवहार करताना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार मोहिम १ एप्रिलपासून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सुरू झाली आहे.
१ एप्रिल ते ५ एप्रिल तलाठ्यांनी चावडी वाचन करून गावनिहाय मृत खातेदारांची यादी तयार करण्यात आली आहे.६ एप्रिल ते २० एप्रिल संबंधित वारसांनी मृत्यूदाखला, प्रतिज्ञापत्र,पोलिस पाटील अथवा सरपंचाचा दाखला व सर्व वारसांची माहिती तलाठ्यांकडे सादर करायची आहे.
२१ एप्रिल ते १० मे पर्यत ई-फेरफार प्रणालीद्वारे वारस नोंदी तयार करून, मंडळ अधिकाऱ्यांनी फेरफार मंजूर करून ७/१२ उताऱ्यावर आवश्यक सुधारणा करण्यात येणार आहेत.
महसूल मंत्री यांच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यभर ही मोहिम एकाचवेळी राबवली जाणार आहे. वारस नोंदी वेळेत न झाल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने, ही मोहिम नागरिकांना मोठा दिलासा देणारी ठरणार आहे.
या मोहिमेमुळे महसूल अभिलेख पारदर्शक व अद्ययावत होतील. वारसांची अधिकृत नोंद झाल्याने वारसांना शेतीच्या व्यवहारात,बँक कर्ज प्रक्रियेत व विविध सरकारी योजनांमध्ये अडचण येणार नाही. जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, वेळेत आवश्यक कागदपत्रे सादर करून मोहिम यशस्वी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व मिळकतधारकांनी आपला ७-१२ तपासून घ्यावा-मोसमी चौगुले.
शासनाने सुरू केलेल्या मोहिमेचा लाभ घेत सर्वानी आपला ७-१२ अद्ययावत करून तर घ्यावा तसेच तपासून ही घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना प्रांताधिकारी मोसमी चौगुले

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800