जलकुंभ उभारणीचे तातडीने कार्यादेश देण्याची उमाकांत दाभोळे यांची मागणी
इचलकरंजी :
शहरातील वाढीव भागाला पुरेसा व स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा यासाठी मंजूर झालेल्या ६ जलकुंभ उभारणीकामी कार्यादेश तातडीने द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील व अतिरिक्त आयुक्त सुश्मा शिंदे-कोल्हे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तत्कालीन आमदार प्रकाश (आण्णा) आवाडे यांनी सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेतून इचलकरंजी शहरासाठी सहा जलकुंभ, दाबनलिका, पंपिंग मशिनरी उभारणी व इतर अनुषंगिक कामांसाठी एकूण ३१ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण करून कार्यादेश देणे शासनाने बंधनकारक केले असून काम पूर्ण करण्याची मुदत १८ महिने निश्चित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून कामात झालेल्या विलंबामुळे आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यानंतर हे काम महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात आले. त्यानंतर २२ मे २०२५ रोजी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असूनही अद्याप कार्यादेश देण्यात आलेला नाही. त्यामुळे जलकुंभ उभारणीच्या कामाला विलंब होत असल्याने वाढीव भागातील नागरिकांना पुरेशा पाणीपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे दाभोळे यांनी नमूद केले आहे.
पि. बा. पाटील मळा (११ लाख लिटर), शांतीनगर (१० लाख लिटर), जवाहरनगर (१४ लाख लिटर), जुना चंदूर रोड (८ लाख लिटर), तोरणानगर (१३ लाख लिटर) आणि तुळजाभवानीनगर (१२ लाख लिटर) येथे जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. हे जलकुंभ तातडीने उभे राहिल्यास शहरातील वाढीव भागाला दैनंदिन मुबलक व स्वच्छ पाणीपुरवठा करता येईल. त्यामुळे कार्यादेश त्वरीत देऊन प्रत्यक्ष काम सुरू करावे, अशी ठाम मागणी दाभोळे यांनी केली आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







