राज्य नाट्य स्पर्धेत मानाच्या रौप्य पदकाची संतोष आबाळे यांची हॅट्ट्रिक
इचलकरंजी:
महाराष्ट्र शासनाची ६३ वी राज्य मराठी हौशी नाट्यस्पर्धा प्राथमिक फेरी नुकतीच पार पडली आणि स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये कोल्हापूर केंद्रामधून येथील मनोरंजन मंडळ या संस्थेने सादर केलेल्या ‘तिचे संदर्भ नसलेली गोष्ट’ या नाटकाने सर्वाधिक पारितोषिके प्राप्त केली. यामध्ये उत्कृष्ट पुरुष अभिनयासाठी दिले जाणारे मानाचे रौप्य पदक संतोष आबाळे यांना नाटकातील ‘तो’ या भूमिकेसाठी जाहीर करण्यात आले. त्याचबरोबर प्रकाश योजना प्रथम – आशिष भागवत आणि रंगभूषा द्वितीय – सुनिता वर्मा अशी पारितोषिके मिळाली आहेत.
हौशी रंगभूमीवर काम करताना अभिनयासाठी रौप्य पदक मिळविणे ही गोष्ट खूप मानाची समजली जाते. अशी सलग तीन रौप्य पदके प्राप्त करणारे आबाळे हे शहरातील पहिलेच कलावंत असून त्यांनी एक प्रकारे इचलकरंजीच्या नाट्य परंपरेत मानाचा तुरा रोवला आहे. महाराष्ट्रात अशी कामगिरी करणारे अगदी मोजके कलाकार आहेत, त्यामध्ये येथील आबाळे यांचा समावेश झाला आहे.
आबाळे यांनी कलाकार म्हणून राज्य नाट्य स्पर्धेत भाग घेतलेल्या तीनही वर्षी यश मिळविले. नथिंग टू से (२०१७-१८) नाटकासाठी प्राथमिक फेरी रौप्य, दो बजनिए (२०१८-१९) नाटकासाठी अंतिम फेरी रौप्य आणि तिचे संदर्भ नसलेली गोष्ट (२०२४-२५) प्राथमिक फेरी रौप्य असे तीन पुरस्कार त्यांनी मिळवले. मध्यंतरी पाच वर्षांत त्यांना प्रत्यक्ष रंगमंचावर काम करता आलं नाही, पण यावेळी रौप्य पदक प्राप्त करून त्यांनी आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली.
संतोष आबाळे हे मनोरंजन मंडळाचे सहकार्यवाह असून नाट्य परिषद इचलकरंजी शाखेचे कार्यवाह आणि साहित्य परिषद इचलकरंजी शाखेचे संचालक या माध्यमातून साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या या गौरवपूर्ण यशाबद्दल त्यांचे समाजातील सर्व थरामधून कौतुक होत आहे. आपल्या या यशामध्ये (स्व.) गिरीश पांडे, देवीदास आमोणकर, यशोधन गडकरी, पायल पांडे – सोनाळे आणि प्रताप सोनाळे यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले, अशी त्यांची स्वतःची भावना आहे.
सलग तिसऱ्यांदा रौप्यपदक विजेते संतोष आबाळे

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800