दैनिक महासत्ताचे संपादक वसंतराव दत्तवाडे यांचे निधन
इचलकरंजी, ता. ११-
दैनिक महासत्ता परिवाराचे सर्वेसर्वा, संस्थापक संपादक श्री वसंतराव कृष्णाजी दत्तवाडे (वय ७८) यांचे शनिवार दि. ११ जुलै २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रकृती स्वाथ्याअभावी संपादक वसंतराव दत्तवाडे यांच्यावर गेल्या काही महिन्यापासून उपचार सुरु होते. दरम्यान शनिवारी पहाटे रहात्या घरीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, चिरंजीव तरुण आणि वरुण यांचेसह दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार आदि सर्व क्षेत्रातील मान्यवरांसह पत्रकार, छायाचित्रकार तसेच लिंगायत समाज बांधव व नातलगांनी मुसळे हायस्कुलनजिक निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.
सकाळी साडेदहा वाजता मुसळे हायस्कुल परिसरातील त्यांच्या निवास स्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रा प्रथम सांगली रोडवरील त्यांच्या जुन्या निवासस्थानी आणण्यात आली. याठिकाणी अनेक मान्यवरांसह नागरिकांनी त्याचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर महासता चौकातील दैनिक महासत्ताच्या मुख्य कार्यालयात त्यांचे पार्थिव नेण्यात आले. याठिकाणी महासत्ता परिवारातील सदस्यांसह भागातील नागरिकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. तेथून पंचगंगा स्मशान भूमीत त्यांच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेमध्ये मोठ्या संख्येने विविध राजकीय सामाजिक, वैद्यकीय, सहकार क्षेत्रातील मान्यवर, समाज बांधव, नातलग, मित्रपरिवार, नागरिक सहभागी झाले होते.
दरम्यान, स्मशानभूमित झालेल्या शोकसभेत आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन उत्तम आवाडे, अहमद मुजावर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते जयकुमार कोले, नगरसेवक अमरजित जाधव, पत्रकार दयानंद लिपारे, किशोर पाटील आदींनी संपादक श्री वसंतराव दत्तवाडे साहेबांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. सर्वसमावेशक आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे व्यक्तिमत्व म्हणन त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. शहराच्या विकासात त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले, इचलकरंजी शहर आणि येथील उद्योगाचा विकास व्हावा यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील होते. उद्योग व्यवसायाबरोबरच कुटूंबवत्सल असे व्यक्तीमत्व आज आपल्यातून निघून गेले आहे, त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखद प्रसंगातून सावरण्यास बळ मिळो, अशी प्रार्थना करण्यात आली.
रक्षा विसर्जन सोमवारी सकाळी साडे आठ वाजता पंचगंगा नदीघाटावर होणार आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







