इचलकरंजीत धर्मवीर संभाजी महाराजांच्या भव्य मूर्तीसाठी निधी संकलन अभियान.
इचलकरंजी –
पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत असून, त्यांच्या कार्याचे स्मरण करणारे स्मारक उभारणे हे प्रत्येक देशभक्त नागरिकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
इचलकरंजी येथे शिवतीर्थ प्रकल्प उभारल्यानंतर आता धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची भव्य मूर्ती उभारण्याचा संकल्प प्रतिष्ठानने घेतला आहे. ही मूर्ती पूर्णपणे लोकवर्गणीतून उभारण्यात येणार असून, यासाठी निधी संकलन अभियान राबविण्यात येणार आहे.
या अभियानाची सुरुवात श्रावण सोमवार दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी होणार असून समारोप भाद्रपद कृष्ण द्वादशी दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात येणार आहे.
या ऐतिहासिक आणि धार्मिक कार्यात इचलकरंजी व परिसरातील सर्व नागरिकांनी, विशेषतः माता-भगिनी व युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष गजानन महाजन गुरुजी, उपाध्यक्ष अरविंद माने, सचिव प्रसाद जाधव आणि खजिनदार युवराज बोनेपाटील यांनी केले आहे.
स्वामी विवेकानंद शिलास्मारक आणि श्रीराम मंदिराप्रमाणेच हा उपक्रमही लोकसहभागातून यशस्वी करायचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. संभाजी महाराजांच्या राष्ट्रभक्तीचे स्मारक म्हणजे आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







