पंचगंगा नदी घाट विकासासाठी आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नांना यश — २ कोटींचा निधी मंजूर
इचलकरंजी : प्रतिनिधी
इचलकरंजी शहरालगत असलेल्या पंचगंगा नदी घाटाच्या विकासासाठी आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यानंतर राज्य शासनाने प्रादेशिक पर्यटन विकास योजना अंतर्गत २ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून घाट परिसराचे सुशोभीकरण, पर्यटन सुविधा उभारणी आणि ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यात येणार आहे.
पंचगंगा नदी घाट हा संस्थान काळात बांधण्यात आलेला असून, येथे महादेव मंदिर, श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे सरकार यांची समाधी, वरद विनायक मंदिर, श्री रेणुका माता मंदिर आणि सूर्य मंदिर अशी पुरातन धार्मिक व ऐतिहासिक स्थळे आहेत. या परिसरात दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रम, उत्सव आणि यात्रा भरत असल्याने भाविकांची मोठी गर्दी होत असते.
Advt
मात्र, गेल्या काही वर्षांत सततच्या पुरामुळे घाट परिसराचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या ठिकाणाचा विकास करून पर्यटनदृष्ट्या आकर्षक बनविण्याची गरज होती. नागरिकांना विरंगुळ्याचे नवे ठिकाण मिळावे तसेच ऐतिहासिक वारसा जतन व्हावा, या उद्देशाने आमदार आवाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
या प्रयत्नांना यश येत राज्य शासनाने २ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे लवकरच पंचगंगा नदी घाटाचे स्वरूप अधिक आकर्षक आणि पर्यटनसुलभ बनणार आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







