ICHMH51NEWS.IN
9921600800

श्री पंचगंगा वरदविनायक मंदिरात कार्तिक संकष्टी निमित्ताने भव्य दिपोत्सव,  सामाजिक उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्री पंचगंगा वरदविनायक मंदिरात कार्तिक संकष्टी निमित्ताने भव्य दिपोत्सव,  सामाजिक उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन.

इचलकरंजी
शहरातील पंचगंगा नदीकाठी वसलेल्या भक्ती चे श्रद्धास्थान श्री वरदविनायक मंदिर परिसरात कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने दिपोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि सामाजिक जाणीवेसह साजरा करण्यात आला. धार्मिक वातावरण, भजन संध्या, अभिषेक पूजन आणि रक्तदानासारख्या समाजहिताच्या उपक्रमांनी या वर्षीचा दिपोत्सव विशेष ठरला.
पहाटे श्री वरदविनायकाची अभिषेक पूजा मंत्रोच्चारांच्या गजरात संपन्न झाली. भाविकांनी गणरायाच्या दर्शनासाठी लवकर सकाळपासूनच गर्दी केली होती. सकाळी भक्तांसाठी “शाबू खिचडी”चा प्रसाद देण्यात आला. दुपारपर्यंत हजारो भक्तांनी गणरायाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. मंदिर परिसर फुलांनी, तोरणांनी आणि दिव्यांनी सजविण्यात आला होता. संध्याकाळी आरतीसोबत दीपोत्सव साजरा करण्यात आला. शेकडो दिव्यांच्या तेजाने संपूर्ण परिसर उजळून निघाला. भक्तिमय वातावरणात ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषात भक्तांचे मन गणरायामध्ये लीन झाले.
या धार्मिक कार्यक्रमासोबतच सामाजिक बांधिलकी जपत श्री वरदविनायक भक्त मंडळ आणि लायन्स क्लब ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” या घोषवाक्याखाली आयोजित या शिबिरात तरुणाईचा सहभाग उल्लेखनीय होता. शिबिरादरम्यान सुमारे ७० ते ८० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. महिला भक्तांनी देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदवून समाजात आदर्श निर्माण केला.
लायन्स क्लब ब्लड बँकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण आरोग्य तपासणी करून रक्तदान प्रक्रिया सुरक्षित आणि सुसज्ज पद्धतीने पार पडली. रक्तदात्यांना प्रमाणपत्रे आणि अल्पोपहार देण्यात आला. या उपक्रमामुळे अनेकांना रक्तदानाचे महत्त्व समजले व सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण झाली.
संध्याकाळी महिला भजनी मंडळाच्या वतीने भजन संध्या आयोजित करण्यात आली होती. पारंपरिक वादन, गाणे आणि भक्तिगीतांच्या सुरांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. ‘सुखकर्ता दु:खहर्ता’, ‘जय देव जय देव’ सारख्या आरत्यांनी गणेशभक्तांना भावविभोर केले.
या सर्व कार्यक्रमाचे नियोजन मंदिर भक्त मंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी केले. त्यांच्या सोबत बाळासाहेब जांभळे, हनुमंत वाळवेकर, शीतल पाटील, विनायक रेडेकर, सुनील ताडे, गजानन स्वामी माजी नगरसेविका सौ संध्या बनसोडे ,धनंजय कदम मोहन नागरे सुधीर जाधव संग्राम स्वामी पंडित काजवे बाळकृष्ण मिठारी गजानन पाटील प्रशांत चाळके राजू तळंदगे मंजुनाथ तंबाखू बंडू शहा  शिवम केसरवानी आदी पदाधिकारी,सेवेकरी आणि महिला मंडळ सदस्य उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा