इचलकरंजीत अफू विक्रीप्रकरणी मध्यप्रदेशातील दोघांविरोधात कारवाई
इचलकरंजी, ता. ११
इचलकरंजी पोलिसांनी एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत मोठी कारवाई करत अफू विक्रीप्रकरणी मध्यप्रदेशातील दोन जणांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ३ लाख १८ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास थोरात चौकाजवळ पन्हाळकर मोटर्स समोर विक्रमनगरकडे जाणाऱ्या रोडवर संशयास्पद हालचाल करणाऱ्या दोन व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील मारुती आल्टो (क्र. एमपी 14 सीसी 1814) या चारचाकी वाहनातून तपासादरम्यान काळसर द्रवरूप अफू असा १ किलो ६८ ग्रॅम वजनाचा आणि १ लाख ९२ हजार २४० रुपये किमतीचा अंमली पदार्थ आढळून आला. वाहनासह एकूण ३ लाख १८ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त वस्तूंमध्ये अफू, मारुती आल्टो कार, रोख रक्कम ५,९०० रुपये, सॅमसंग गॅलेक्सी ए ५५ मोबाईल, ओपो ए ७८ मोबाईल असा समावेश आहे. या प्रकरणी दिनेश पृथ्वीराज मालवीया (वय ४६, रा. पार्थ १४६ सखतली, सीतामऊ, जि. मंदसौर, म. प्र.) आणि संजय रामलालजी चौहान (वय २२, रा. लामगरा, जि. मंदसौर, म. प्र.) या दोघांविरोधात इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अमर मेघनाथ शिरढोणे यांच्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्यात पोलीस हवालदार पाथरवट तपास करत आहेत.
अफूच्या साठ्यासह संशयित आरोपी व पोलीस
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









