ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिकेत कमळ फुलवण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने झटावे – सहपालकमंत्री माधुरी मिसाळ

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिकेत कमळ फुलवण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने झटावे – सहपालकमंत्री माधुरी मिसाळ

इचलकरंजी/प्रतिनिधी :
“आगामी निवडणुका या नेत्यांच्या नव्हे तर कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या विजयासाठी नेत्यांनी न्याय द्यावा आणि कार्यकर्त्यांनीही आपापसातील मतभेद विसरून महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवावा,” असे आवाहन राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालकमंत्री सौ. माधुरी मिसाळ यांनी केले.

भारतीय जनता पार्टी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील पूर्व, पश्चिम व ग्रामीण मंडळांच्या नियुक्त पदाधिकाऱ्यांना पत्र वाटप व कार्यकर्ता मेळाव्यात त्या मार्गदर्शन करत होत्या. त्या म्हणाल्या, “केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाची घोडदौड सुरू आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जनतेशी संपर्क ठेवत पक्षाचे विचार घराघरात पोहोचवावेत.”

“नेत्यांच्या निवडणुका संपल्या असून आता निष्ठावंत कार्यकर्त्यांचा काळ आला आहे. इचलकरंजीत आवाडे आणि हाळवणकर यांच्या एकजुटीमुळे प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळेल. राजकीय इच्छाशक्ती असेल तर कोणताच प्रश्न प्रलंबित राहत नाही. लवकरच इचलकरंजीकरांना याचा अनुभव येईल,” असेही मिसाळ यांनी सांगितले.

मेळाव्यात आमदार राहुल आवाडे यांनी पक्षादेशाचे पालन करून प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त करत, “इचलकरंजी महानगरपालिकेत ५० पेक्षा अधिक जागा भाजपाला मिळतील,” असे ठामपणे सांगितले. प्रदेशाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी “भाजपा ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. आवाडे-हाळवणकर एकजुट असून महानगरपालिकेचा पहिला महापौर भाजपाचाच असेल,” असे सांगितले.

माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, “मागील निवडणुकीत कार्यकर्त्यांनी एकसंधपणा दाखविला. यावेळी आम्ही नेते त्याचे उत्तरदायित्व पार पाडू. महानगरपालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढवली जाणार आहे. जर कोणी मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करेल, तोच अडचणीत येईल.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा चिटणीस शेखर शहा यांनी केले. आभार पश्चिम मंडळ अध्यक्ष शशिकांत मोहिते यांनी मानले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, महिला आघाडी अध्यक्षा पुष्पा पाटील, अंजुम मुजुमदार, अनिल डाळ्या, तसेच विविध मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनोगत व्यक्त करताना सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, व्यासपीठावर आ.राहुल आवाडे,प्रकाश आवाडे,सुरेश हाळवणकर,राजवर्धन नाईक निंबाळकर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा