डॉ बाबासाहेब आंबेडकरांची आर्थिक दृष्टी आजच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य पाया : प्रा. डॉ. प्रभाकर माने
इचलकरंजी
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित, श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग आणि अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एका विशिष्ट व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रो. डॉ.प्रभाकर माने उपस्थित होते.
यावेळी “शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आणि शेतकरी हा आर्थिक प्रवाहाचा केंद्रबिंदू आहे,” असे प्रतिपादन प्रा. डॉ. प्रभाकर माने यांनी केले.
डॉ. माने म्हणाले की, समाजातील शेतकरी, मागास, दलित व वंचित घटकांच्या न्यायहक्कासाठी आर्थिक न्याय व संधीची समानता अत्यंत महत्त्वाची आहे. डॉ. आंबेडकरांनी दिलेली आर्थिक दृष्टी सक्षम समाज व राष्ट्रनिर्मितीचा पाया ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले.आंबेडकरांच्या शेतीविषयक विचारांची मांडणी करताना त्यांनी जमीनदारी व खोतवाडी पद्धतीचा विरोध, थेट जमीन मालकी हक्क, कर्जबाजारीपणातून मुक्तता, जमिनीचे वैज्ञानिक वाटप, सहकार व संयुक्त शेती, जमिनी विभाजनाला विरोध व परिणामकारक कृषी धोरणाची गरज या बाबींचे सविस्तर विश्लेषण केले. तसेच डॉ. आंबेडकरांच्या जलधोरण, पाणी व्यवस्थापन व देशाच्या सर्वांगीण विकासात जलसंपत्तीच्या सुयोग्य वापराचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.गरीबी निर्मूलन, करप्रणाली, शिक्षण व आर्थिक उन्नतीसंबंधी डॉ. आंबेडकरांनी मांडलेल्या आर्थिक धोरणांवरही त्यांनी प्रकाश टाकला.
अध्यक्षीय भाषणात प्र.प्राचार्य प्रो.डॉ. त्रिशला कदम म्हणाल्या की, “आर्थिक न्याय व संधीची समानता हीच सक्षम राष्ट्रनिर्मितीचा मुख्य स्तंभ आहे.” त्यांनी अर्थशास्त्रज्ञ डॉ. केन्स व डॉ. आंबेडकर यांच्या चलनविषयक विचारांची तौलनिक मांडणी केली.
कार्यक्रमात अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थिनींनी अर्थ, जलव्यवस्था, शेती, औद्योगिक धोरण व चलनव्यवस्था यावर आकर्षक भित्तीपत्रके प्रदर्शित करून सादर केली.
प्रा. डॉ. सोमनाथ काळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. संभाजी निकम यांनी करून दिला. आभार साक्षी हुपरे यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा पैलवान यांनी केले.
यावेळी कॅप्टन प्रमिला सुर्वे, प्रा. डॉ. मनोज जाधव, प्रा. अंकुश कुरणे,प्रा.सदलगे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भित्तीपत्रकासमवेत डॉ.प्रभाकर माने,प्रा त्रिशला कदम व शिक्षक
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




