बहुजन समाजाच्या वतीने शंभूतीर्थास तोरण
इचलकरंजी
शहरातील मलाबादे चौकात नव्याने उभारण्यात आलेल्या श्री शंभूतीर्थ येथे मातंग समाजाच्या पुढाकारातून बहुजन समाजासह बारा बलुतेदारांच्या सहभागातून मानाचा तोरण अर्पण करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराजांना मुजरा करत धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक उत्साहात हा अनोखा उपक्रम पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात श्री शिवतीर्थ येथे विधिवत पूजा आणि तोरणाचे अभिषेक करून करण्यात आली. त्यानंतर लेझीम, ढोल-ताशे, वारकऱ्यांच्या टाळ-मृदुंगाच्या तालात शहरातील मुख्य मार्गावरून पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी डोक्यावर मंगल कलश आणि गारवा वाहत श्री शंभूतीर्थ परिसरात आगमन केले. जय भवानी, जय शिवाजी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय आणि मातंग-बहुजन समाजाचा मानाचा मुजरा अशा घोषणांनी वातावरण दणाणले होते.
श्री शंभूतीर्थ येथे माजी बांधकाम सभापती भाऊसो आवळे आणि माजी उपनगराध्यक्षा सरिता आवळे यांच्या हस्ते तोरण बांधण्याचा विधी पार पडला. मातंग समाजाच्या पुढाकारातून गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मालिकेत हा कार्यक्रम विशेष ठरला.
कॉ. मलाबादे चौकात उभारण्यात आलेल्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यालाही मानाचा तोरण अर्पण करण्यात आला. या उपक्रमाने इचलकरंजीत सामाजिक एकता, शिवभक्ती आणि संस्कृतीचे पुनरुज्जीवन झाल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन महाजन गुरुजी, प्रसाद जाधव, पुंडलिक जाधव, सागर चाळके, तानाजी पोवार, दिलीप मुथा, प्रकाश पाटील, सोनाली अनुसे, अजित जाधव, लक्ष्मी पाटील, शुभांगी माळी, नीता भोसले आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
तसेच अक्काताई आवळे, ध्रुवती दळवाई, अब्राहम आवळे, क्रांती आवळे, रुबेन आवळे, गोरख हत्तीकर, रणजीत मिसाळ इत्यादींसह मोठ्या संख्येने मातंग व बहुजन समाज बांधव उपस्थित होते.
शंभूतीर्थास तोरण अर्पण करताना बहुजन समाज बांधव
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








