इमनपा निवडणूक महायुतीचा विकासाभिमुख जाहीरनामा जाहीर.
इचलकरंजी:
इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या महायुतीकडून शहराच्या सर्वांगीण विकासाचा व्यापक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. पाणीपुरवठा, आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक, क्रीडा, व्यापार, पर्यावरण, महिला व नागरिक सुरक्षा आदी विविध क्षेत्रांचा समावेश या जाहीरनाम्यात करण्यात आला आहे.
पाणीपुरवठा व पर्यावरण संरक्षणावर भर
शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेचे सुसूत्रीकरण करून नियमित व समतोल पाणीपुरवठा करण्याचा संकल्प जाहीरनाम्यात मांडण्यात आला आहे. खराब झालेल्या पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन बसविणे, वाढीव वसाहती, उपनगर व मळेभागात नियमित पाणीपुरवठा, प्रत्येक प्रभागात शुद्ध पेयजल युनिट सुरू करून २४ तास पाणी देणे, तसेच औद्योगिक सांडपाणी शुद्धीकरणासाठी आर.ओ. व आधुनिक एस.टी.पी. प्रकल्प उभारून पंचगंगेचे प्रदूषण कमी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. यासोबतच दोन नवीन एस.टी.पी. प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.
आरोग्य सुविधा बळकट करणार
इंदिरा गांधी (IGM) रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा सुरू असून, २४ तास कार्यरत असलेले हे रुग्णालय ३०० बेड क्षमतेचे करण्यात येणार आहे. नव्याने मंजूर झालेल्या नर्सिंग कॉलेजचे काम पूर्ण करून ते सुरू करण्यात येणार असून, वॉर्डनिहाय आरोग्य केंद्रे अद्ययावत करून नागरिकांना अधिक सुलभ आरोग्यसेवा देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन
शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती प्रकल्प राबविणे, घंटागाडीच्या माध्यमातून दररोज घराघरातून कचरा संकलन, मोठ्या आरसीसी गटारी व नाल्यांची सफाई, भूमिगत ड्रेनेज व्यवस्था आणि काळा ओढा संरक्षक भिंतींसह प्रवाही ठेवण्याचे नियोजन जाहीरनाम्यात नमूद आहे.
व्यापार, वाहतूक व रोजगार
छोट्या व्यापाऱ्यांसाठी व्यापारी संकुले उभारून गाळे उपलब्ध करून देणे, परवाने तात्काळ मिळण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करणे, व्यापाऱ्यांच्या व्यापारवृद्धीसाठी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, तसेच आणखी दोन ठिकाणी छोटे सभागृह उभारण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
शहरांतर्गत वाहतुकीसाठी ई-बस सेवा सुरू करून महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना सवलत देणे व स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा संकल्पही मांडण्यात आला आहे.
क्रीडा, रस्ते व पूरनियंत्रण
राष्ट्रीय, राज्य व जिल्हा स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे आयोजन, राजाराम स्टेडियमचा विकास, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल, जलतरण तलावांचे नूतनीकरण, तसेच पूरस्थितीवर नियंत्रणासाठी नदी-नाल्यांवर बॉक्ससेल ब्रिज, गाळ उपसा व संरक्षक भिंती बांधण्याच्या उपाययोजना जाहीरनाम्यात आहेत.
मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण, काँक्रीट रस्ते, रिंग रोड, पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण यावरही भर देण्यात आला आहे.
सौरऊर्जा, सुरक्षा व सामाजिक विकास
शहरातील चौकांमध्ये हायमास्ट सौर दिवे, शेतरस्त्यांवर सौर पथदिवे, सोलार सिटीची दिशा, सीसीटीव्ही यंत्रणा, महिला सुरक्षेसाठी विशेष उपाय, बागा, नाना-नानी पार्क, ऑक्सिजन पार्क, स्वच्छतागृहे, बचतगट उत्पादनांसाठी शॉपिंग मॉल, Wi-Fi युक्त शासकीय कार्यालये यांचा समावेश जाहीरनाम्यात आहे.
यावेळी आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, शशिकांत मोहिते, शेखर शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
महायुतीच्या वतीने जाहीरनाम्यातील सर्व संकल्प पूर्णत्वास नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून, इचलकरंजीच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांचा पाठिंबा अपेक्षित असल्याचे नेत्यांनी सांगितले.
जाहिरनामा प्रसिद्धीवेळी आ.राहुल आवाडे,प्रकाश आवाडे,सुरेश हाळवणकर,राजवर्धन निंबाळकर,
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







