ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत मोफत दहन–दफन निधी योजना पुन्हा सुरू करण्याची उमाकांत दाभोळे यांची मागणी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत मोफत दहन–दफन निधी योजना पुन्हा सुरू करण्याची उमाकांत दाभोळे यांची मागणी

इचलकरंजी :
शहरातील सर्व नागरिकांसाठी मोफत दहन–दफन निधी योजना तात्काळ पुन्हा सुरू करून निधीची रक्कम किमान ४,००० करण्यात यावी, अशी मागणी भाजप उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन इचलकरंजी महानगरपालिकाच्या महापौर, उपमहापौर व विरोधी पक्षनेते यांना सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, २०२२ मध्ये नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर वाढत्या आर्थिक बोजाचे कारण देत २७ एप्रिल २०२३ पासून सर्वसामान्य नागरिकांसाठी लागू असलेली मोफत दहन–दफन निधी योजना बंद करण्यात आली. त्यानंतर ही योजना केवळ दारिद्ररेषेखालील (BPL) कुटुंबांपुरती मर्यादित करण्यात आली. गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ सातत्याने सुरू असलेली ही योजना बंद झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
शहरात दरमहा सरासरी १२५ दहन–दफन होतात. एका अंत्यसंस्कारासाठी सध्या किमान ₹२,५०० ते ₹३,५०० पेक्षा अधिक खर्च येत असून लाकूड, गॅस, वाहतूक, धार्मिक विधी साहित्य व मजुरी दरांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांनाही अंत्यसंस्काराच्या वेळी मोठा आर्थिक ताण सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद आहे.
महापालिकेने डिसेंबर २०२१ मध्ये दहन–दफन निधी ₹१,००० वरून ₹३,००० केला होता. त्यावेळी वार्षिक खर्च अंदाजे ₹१५ लाखांवरून ₹४५ लाखांपर्यंत वाढला होता. मात्र हा खर्च महानगरपालिकेच्या एकूण अर्थसंकल्पाच्या तुलनेत अत्यल्प असून नागरिकांच्या दुःखद प्रसंगी दिलासा देणारा असल्याचे दाभोळे यांनी स्पष्ट केले.
सध्या शहरात १०,७६१ दारिद्ररेषेखालील कुटुंबे व ५२,४०१ नागरिक असूनही २०२३ पासून या योजनेअंतर्गत अत्यल्प अर्ज दाखल झाले आहेत. यावरून योजना प्रत्यक्ष गरजूंपर्यंत प्रभावीपणे पोहोचत नसल्याचे दिसून येते, असेही निवेदनात नमूद आहे.
प्रमुख मागण्या :
मोफत दहन–दफन निधी योजना सर्व नागरिकांसाठी तात्काळ पुन्हा सुरू करावी.
वाढती महागाई लक्षात घेऊन निधीची रक्कम किमान ₹४,००० निश्चित करावी.
ते शक्य नसल्यास किमान पूर्वीप्रमाणे ₹३,००० निधी सर्वांना देण्यात यावा.
ही मदत जात, धर्म, आर्थिक वर्ग किंवा BPL अटींशिवाय सर्वांसाठी समान असावी.
योजनेची अंमलबजावणी सोप्या कागदपत्रांवर, पारदर्शक व ऑनलाइन पद्धतीने करण्यात यावी.
नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी स्थायी समिती व येणाऱ्या अर्थसंकल्पीय बैठकीत या संवेदनशील विषयावर सकारात्मक निर्णय घेऊन शहरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
यावेळी भाजपा पदाधिकारी शुभम बरगे, मनोज बनसोडे व मनोज तराळ उपस्थित होते.

महापौर उदय धातूंडे व उपमहापौर अनिल डाळ्या यांना निवेदन देताना उमाकांत दाभोळे व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा