इतिवृत्त कायम करणे व बायोमायनिंग–बायोरेमीडिएशन वर्कऑर्डरवरून महापौरांची कोंडी,विरोधक आक्रमक; विशेष सभेची मागणी
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी झालेल्या सभेत इतिवृत्त कायम करणे तसेच बायोमायनिंग व बायोरेमीडिएशन वर्कऑर्डर या मुद्द्यांवरून महापौरांची कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी या विषयावर आक्रमक भूमिका घेत महापौरांना धारेवर धरले.
सभेदरम्यान संबंधित कामांच्या फाईल्सबाबत प्रश्न उपस्थित करताना पाटील यांनी, “वृत्तपत्रांत बातम्या प्रसिद्ध होत आहेत, मात्र प्रशासनातील अधिकारी फोन उचलत नाहीत. सदर फाईल नेमकी कुठे आहे?” अशी प्रश्नांची सरबत्ती केली. यामुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
महापौरांनी उत्तर देताना, “तीन दिवसांपूर्वी लेखी स्वरूपात विषय दिल्यास त्यावर सविस्तर चर्चा करण्यात येईल,” असे सांगितले. मात्र या उत्तरानंतरही वातावरण अधिकच तापल्याचे दिसून आले.
प्रशासकीय कालावधीत झालेल्या कामांसाठी मजुरी अदा करण्यासाठी मागील महासभेचे इतिवृत्त कायम करण्यात आले नसल्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांसह सत्ताधारी नगरसेवक रवींद्र माने यांनीही आक्रमक भूमिका घेतली. या पार्श्वभूमीवर प्रदीप धुत्रे यांनी या विषयावर विशेष सभा बोलवण्याची मागणी केली.
प्रशासनाची सावध व सोयीस्कर भूमिका.
सभागृहात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आयुक्तांनी महापौरांना संबंधित कामे नियमानुसार झाल्याचे सांगण्याची आवश्यकता होती त्यानुसार महापौरांनी सभागृहात उत्तर दिले असते मात्र आयुक्तांनी त्यावेळी शांत राहणे पसंत केले.
प्रशासनाने नंतर प्रसिद्धीपत्रकाद्वारे कामकाज नियमानुसार झाल्याचे माध्यमांना कळवले असले तरी संबंधित कामाची फाईल आरोग्य विभागात का उपलब्ध नाही, व ती कुठे आहे प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याने संभ्रम कायम आहे.दरम्यान, या प्रकरणामुळे मनपातील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, विशेष सभेत या मुद्द्यावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







