तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुलाला गती द्यावी – खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी
नवी दिल्ली :
सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मांडत तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुलाच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी केली. या मागणीला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन यांनी संसदेत सकारात्मक प्रतिसाद देत प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली.
संसदेतील चर्चेदरम्यान खासदार महाडिक यांनी कोल्हापूरला जोडणाऱ्या विविध राष्ट्रीय महामार्गांच्या विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारने दिलेल्या निधीबद्दल आभार व्यक्त केले. कागल ते सातारा सहा लेन कॉंक्रीट रस्त्यासाठी सुमारे २,१६२ कोटी रुपये, कोल्हापूर ते रत्नागिरी चार लेन कॉंक्रीट रस्त्यासाठी ५,१९२ कोटी रुपये तर कोल्हापूर ते सांगली चौपदरी रस्त्यासाठी १,१९२ कोटी रुपयांची कामे सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
याशिवाय शिरोलीजवळील सांगली फाट्यापासून उंचगावपर्यंत सुमारे ३.६ किलोमीटर लांबीचा पिलरवरील उड्डाण पुल उभारण्यात येणार असून त्यासोबत कोल्हापूर शहरात प्रवेशासाठी बास्केट ब्रिज उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महामार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
मात्र शहरातील वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुलाच्या कामाला गती द्यावी, तसेच हा उड्डाण पुल पन्हाळा रोडवरील कोतोलीपर्यंत वाढवावा आणि शहरातील एका बाजूचा विस्तार फुलेवाडीपर्यंत करावा, अशी मागणी खासदार महाडिक यांनी संसदेत केली.
यावर उत्तर देताना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले की, कोल्हापूर महापालिकेने युटिलिटी शिफ्टिंग आणि जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण केल्यास केंद्र सरकारकडून उड्डाण पुलाच्या कामासाठी पूर्ण सहकार्य दिले जाईल.
गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत रस्ते विकासासाठी सुमारे २५ हजार कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर झाला असून अनेक महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत किंवा पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. शिरोली ते उचगाव दरम्यानच्या उड्डाण पुलासाठी ९१३ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून कागल शहराजवळील ३५८ कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पालाही मंजुरी देण्यात आली आहे.
खासदार महाडिक यांनी पिलरवरील उड्डाण पुल आणि बास्केट ब्रिजप्रमाणेच आता कोल्हापूर शहरातील उड्डाण पुलासाठीही सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूरच्या प्रगतीचे गडकरींकडून कौतुक
संसदेत बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाचे कौतुक केले. सहकार, कृषी, उद्योग आणि पर्यटन क्षेत्रात कोल्हापूर आघाडीवर असून दरडोई उत्पन्नातही कोल्हापूर देशात अग्रस्थानी असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच खासदार धनंजय महाडिक यांनी बास्केट ब्रिज प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला असून त्यांनी सुचविलेले डिझाईन सर्वोत्तम असल्याने रस्ते विकास महामंडळाने तेच डिझाईन स्वीकारले, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.
संसदेत बोलताना खासदार धनंजय महाडिक
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







