‘ जणू अंगी राघवशेला ‘ कवी ग्रेस यांना अभिवादन मैफल
इचलकरंजी
ख्यातनाम कवी ग्रेस अर्थात माणिक शंकर गोडघाटे यांच्या चौदाव्या स्मृतिदिनानिमित्त ‘ जणू अंगी राघव शेला ‘ ही अतिशय सुंदर मैफल स्वानंदीच्या प्रांगणात संपन्न झाली. भारतरत्न लतादीदी, पंडित हृदयनाथ मंगेशकर ,कवी ग्रेस, सुधीर फडके यांच्यासह अनेक मान्यवरांच्या सहवासाने पुनीत झालेल्या दिलीप व दिपश्री शेंडे यांच्या निवासस्थानी झालेल्या या मैफलीत पंडित आशुतोष कुलकर्णी (पुणे) आणि रूपक कुलकर्णी ( सोलापूर) यांनी अप्रतिम गाणी पेश केली. त्यांना झंकार कुलकर्णी व शर्वरी कुलकर्णी ( सोलापूर) यांनी तबला व संवादिनीची साथ दिली. तसेच यावेळी
स्वरदा मोहळकर ,अदिती कुलकर्णी ,पूजा पंडला ( सोलापूर ) या नवोदित गायिकांनी उत्तम गाणी सादर केली.
या मैफलीत कवी ग्रेस यांच्या अनेक कविता व गीते अप्रतिम पद्धतीने सादर केली. सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघवशेला, तो बोल हळवासा आयुष्य स्पर्शूनी गेला.. भय इथले संपत नाही, ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, वाऱ्याने हलते रान ,घर थकलेले संन्यासी, तुला पाहिले मी नदीच्या किनारी यासह श्री रामचंद्र कृपालु भजनम हरण भवभय दारूणम, सावळा ग रामचंद्र अशी रामनवमी निमित्त रामाचीही काही गीते सादर करून रसिकांची मने जिंकली. तसेच पंडित आशुतोष कुलकर्णी आणि शर्वरी कुलकर्णी यांनी स्वतः संगीत दिलेली काही गीतेही सादर केली.एकूणच ही राघवशेला मैफल अतिशय सुंदर, रेशमी, तलम आणि नजाकतदार झाली.
मैफलीचा प्रारंभी डॉ. विजय बेनाडीकर यांनी कवी ग्रेस यांच्या स्नेहभावी आठवणी सांगितल्या.तर दिलीप शेंडे यांनी सादर होणाऱ्या प्रत्येक गाण्यापूर्वी त्या गाण्याचा अन्वयार्थ आणि त्याच्याशी जोडलेल्या कवी ग्रेस यांच्या अमिट आठवणीचा अन्वयार्थ सांगत मोठी रंगत आणली. स्वानंदीच्या प्रांगणात ग्रेस यांचा दोन तपांचा सहवास विषद केला. आणि चौदा वर्षाचा वनवास संपवून कवी ग्रेस पुन्हा इचलकरंजी परिसरात जन्माला यावेत अशी भावना व्यक्त केली.
सुरुवातीस ज्येष्ठ इतिहासकार डॉ.जयसिंगराव पवार यांना आदरांजली वाहण्यात आली.यावेळी कवयित्री श्वेता लांडे यांचा डॉ.विलास जोशी व डॉ.विजय बेनाडीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या खास मैफलीसाठी मंचासह संपूर्ण सभागृहात ग्रेस यांच्या अनेक कवितांचे व छायाचित्रांचे फलक लावण्यात आले होते. तसेच ग्रेस यांना मिळालेले त्यांचे अखेरचे सन्मानचिन्हही ठेवण्यात आले होते.
अडीच तासांहून अधिक काळ रंगलेल्या या मैफलीस इचलकरंजी व परिसरातील साहित्य व गानरसिक मान्यवरांचा मोठा प्रतिसाद मिळाला.प्रसाद कुलकर्णी यांनी आभार मानले.
सादरीकरण करताना पंडित आशुतोष कुलकर्णी व रूपक कुलकर्णी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





