इचलकरंजी महानगरपालिकेत अभिलेख पाहणीसाठी शासन परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याची शशांक बावचकर मागणी
इचलकरंजी :
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत दाखल होणाऱ्या अर्जांची संख्या कमी करून प्रशासनात पारदर्शकता वाढविण्याच्या उद्देशाने नागरिकांना अभिलेख अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्याच्या शासन परिपत्रकाची अंमलबजावणी इचलकरंजी महानगरपालिकेत तातडीने करण्यात यावी, अशी मागणी शशांक मल्हारराव बावचकर यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पुणे महानगरपालिकेने नागरिकांना अभिलेख अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्याचा यशस्वी प्रयोग केला होता. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने २८ नोव्हेंबर २०१८ रोजी परिपत्रक जारी करून राज्यातील सर्व जिल्हास्तरीय कार्यालये, महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये प्रत्येक सोमवारी नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार अभिलेख अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.
सदर परिपत्रकामुळे शासकीय कामकाजात गतिमानता येण्यासोबतच पारदर्शकता वाढण्यास मदत होणार असून माहिती अधिकार अर्जांची संख्या कमी होण्याची अपेक्षा आहे. मात्र, या परिपत्रकाची अंमलबजावणी अनेक ठिकाणी अद्याप प्रभावीपणे होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिकेतील सर्व विभागांना आदेश देऊन शासनाच्या परिपत्रकाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना सुलभपणे माहिती मिळावी यासाठी ठोस यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






