इचलकरंजी महानगरपालिकेचा ‘अर्थहीन’ संकल्प : शशांक बावचकर यांची टीका
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेने सादर केलेले पहिले अंदाजपत्रक हे केवळ आकड्यांचा खेळ असून प्रत्यक्षात अर्थहीन असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शशांक बावचकर यांनी केली आहे.
महापालिकेच्या सभागृहात २७ मार्च रोजी सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकात ९८ कोटी रुपयांची तूट दाखविण्यात आली होती. मात्र त्याचे ३२ लाख रुपयांच्या शिल्लकी अंदाजपत्रकात रूपांतर कसे झाले, हा गंभीर प्रश्न असल्याचे बावचकर यांनी म्हटले आहे. यावरून जमेच्या बाजूला अवास्तव व प्रत्यक्षात न मिळणारे उत्पन्न दाखवून खर्च वाढवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
शहरातील मूलभूत प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असताना या अंदाजपत्रकात ठोस उपाययोजना दिसत नाहीत. पायाभूत सुविधा, शिक्षण क्षेत्रातील आधुनिकीकरण, रस्ते व गटारी, पंचगंगा नदी प्रदूषणमुक्ती, सुळकुड पाणी योजना तसेच ड्रेनेज प्रकल्पासाठी लागणारा १५५ कोटींचा निधी याबाबत स्पष्ट धोरण नसल्याचे त्यांनी नमूद केले.
केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान मिळेल या अपेक्षेवर आधारित अंदाजपत्रक तयार करण्यात आल्याची टीका करताना त्यांनी राज्य शासनाच्या आर्थिक स्थितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जीएसटी परताव्याचे ६५७ कोटी रुपये अद्याप मिळाले नसल्याने महापालिकेने स्वयंपूर्णतेकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिकेने उत्पन्न वाढवून खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असून भविष्यात कर्मचाऱ्यांचे वेतनही स्वउत्पन्नातून करावे लागणार असल्याची जाणीव ठेवावी, असेही त्यांनी म्हटले. अन्यथा आर्थिक परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
महापालिकेच्या तिजोरीतील निधी पारदर्शकपणे वापरला गेला पाहिजे, अन्यथा व्यवस्थेत कोणताही बदल होणार नाही, असा इशाराही बावचकर यांनी दिला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









