ईव्ही वाहन खरेदीचा प्रस्ताव; महानगरपालिकेच्या खर्चात लाखोंची बचत शक्य-उमाकांत दाभोळे
इचलकरंजी :
महानगरपालिकेच्या ताफ्यात इलेक्ट्रिक (EV) वाहने समाविष्ट करावीत, अशी मागणी भाजपा उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी महापौर, आयुक्त, उपमहापौर व विरोधी पक्षनेते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. इंधन खर्चात बचत, प्रदूषण नियंत्रण आणि घरफाळा (मालमत्ता कर) वसुली मोहिम अधिक गतिमान करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल, असे त्यांनी नमूद केले आहे.
सध्या महानगरपालिकेच्या विविध प्रशासकीय कामांसाठी, पाहणी दौऱ्यांसाठी तसेच आपत्कालीन सेवांसाठी पेट्रोल व डिझेल वाहनांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असून त्यावर दरमहा मोठा खर्च होतो. ईव्ही वाहनांचा वापर केल्यास प्रति वाहन दरमहा सुमारे ₹२०,००० ते ₹२५,००० इतकी बचत होऊ शकते. तसेच या वाहनांचा देखभाल खर्चही तुलनेने कमी असल्याने वार्षिक खर्चात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
ईव्ही वाहनांचा वापर वाढवल्यास शहरातील वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होईल व पर्यावरणपूरक धोरणांना चालना मिळेल. याशिवाय घरफाळा वसुली विभागासाठी स्वतंत्र वाहने उपलब्ध करून दिल्यास थकबाकी वसुली मोहिम अधिक प्रभावीपणे राबवता येईल आणि महसूल वाढीस हातभार लागेल. भाडेतत्त्वावरील वाहनांचा खर्चही कमी होईल.
महानगरपालिका मुख्य इमारत तसेच इतर प्रशासकीय ठिकाणी ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्याची सूचनाही निवेदनात करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनाही सुविधा मिळून शुल्काच्या माध्यमातून महानगरपालिकेला अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत निर्माण होऊ शकतो.
प्रारंभी काही ईव्ही वाहने खरेदी करून टप्प्याटप्प्याने पेट्रोल-डिझेल वाहनांची जागा ईव्ही वाहनांनी घ्यावी, तसेच शासनाच्या अनुदानाचा लाभ घेत ईव्ही धोरण राबवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे खर्च बचत, पर्यावरण संरक्षण आणि महसूल वाढ या तिन्ही बाबींना चालना मिळेल, अशी अपेक्षा उमाकांत दाभोळे यांनी व्यक्त केली आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





