जयसिंगपूरात २ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; ६.२० लाखांचे दागिने जप्त
जयसिंगपुर
जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने घरफोडीचा गुन्हा अवघ्या दोन तासांत उघडकीस आणत संशयित महिला आरोपीला ताब्यात घेतले. तिच्याकडून सुमारे ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण ६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उदगाव (ता. शिरोळ) येथील श्रीकांत तातोबा चिवटे (वय ५८) यांच्या राहत्या घरात ३० एप्रिल रोजी सकाळी ७.१५ ते ८.१० या दरम्यान अज्ञात चोरट्याने चावीने कुलूप उघडून घरात प्रवेश केला व तिजोरीतील सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तातडीने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलीस कॉन्स्टेबल जावेद आंबेकरी यांना गोपनीय माहिती मिळाली की, उदगाव येथील सौ. रुपाली संजय संकपाळ (वय ४३) हिने ही घरफोडी केली असून चोरीचे सोने बँकेत ठेवून कर्ज काढण्याच्या तयारीत आहे.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र कसून चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. तिच्या घरातून सुमारे ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, नेकलेस, चेन, अंगठ्या, कानातले आदी दागिने जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ६.२० लाख रुपये इतकी आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक युनुस इनामदार, ताहीर मुल्ला तसेच जावेद आंबेकरी, रहीमान शेख, शुभम घाटगे, महेश घाटगे, प्रिया कदम आदींचा सहभाग होता.पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी या कारवाईबद्दल पथकाचे कौतुक केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








