खोतवाडीत दोन ज्वेलर्स दुकानांवर धाडसी चोरी; ७.३६ लाखांचे चांदीचे दागिने लंपास
इचलकरंजी:
खोतवाडी चौक परिसरात अज्ञात चोरट्यांनी दोन ज्वेलर्स दुकाने फोडून तब्बल ७ लाख ३६ हजार ८२० रुपयांचे चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की फिर्यादी अल्लाउद्दीन शमशुद्दीन सनदी यांचे (वय ३७, रा. कबनूर, ता. हातकणंगले) यांचे खोतवाडी चौक येथे “सनदी ज्वेलर्स” नावाचे दुकान आहे. तसेच त्यांचे मित्र अक्षय रघुनाथ कदम यांचे “आई ज्वेलर्स” हे दुकान ठाकरे चौक, खोतवाडी येथे आहे.
दि. ७ मे रोजी सायंकाळी ६ ते ८ मे रोजी पहाटे ४.२६ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दोन्ही दुकानांचे शटर लॉक तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील चांदीचे दागिने चोरून नेले.
सनदी ज्वेलर्समधून चांदीचे पैंजण, बिछवे, अंगठ्या, जोडवी आणि बिंदल्या असा सुमारे ६ लाख ५४ हजार ३६० रुपयांचा ऐवज चोरीस गेला. तर आई ज्वेलर्समधून पैंजण, पाळणे, घोडे आणि अंगठ्या असा ८२ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला.
या चोरीत एकूण ५.५४० किलो वजनाचे चांदीचे दागिने लंपास करण्यात आले असून त्याची किंमत ७ लाख ३६ हजार ८२० रुपये इतकी आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे करत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






