ICHMH51NEWS.IN
9921600800

पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारीचा देशाला लाभ- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारीचा देशाला लाभ- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

इचलकरंजी :
जनतेने काम करणारे सरकार निवडल्यामुळे देशात गेल्या बारा वर्षांत अनेक ऐतिहासिक निर्णय आणि विकासकामे पूर्ण झाली असून २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार सातत्याने काम करत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी इचलकरंजी येथे केले.
कल्लाप्पाण्णा आवाडे जनता सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यासह जवाहर सहकारी साखर कारखान्याच्या नामविस्तार कार्यक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अमित शहा यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गेल्या बारा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्राला विशेष महत्त्व देण्यात आले. त्यासाठी स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन करून विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात आली. भारताने चंद्रयान मोहिमेद्वारे चंद्रावर झेंडा फडकवला, कलम ३७० रद्द केले तसेच श्रीराम मंदिराचे बांधकाम पूर्ण केले, असे त्यांनी नमूद केले.
पश्चिम महाराष्ट्र आणि विशेषतः कोल्हापूर विभागातील साखर उद्योगाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, या भागातील साखर कारखानदारीमुळे संपूर्ण देशाला लाभ झाला आहे. साखर उद्योगाला चालना देण्यासाठी सुमारे दहा हजार कोटी रुपयांच्या अर्थसाहाय्यास मंजुरी देण्यात आली असून इथेनॉलवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी करून उद्योगाला मदत करण्यात आली अनेक बंद पडलेले साखर कारखाने सुरू करण्यात आले.
सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल अमित शहा यांच्या हस्ते कल्लाप्पाण्णा आवाडेदादा यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार राहुल आवाडे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, दीड वर्षांपूर्वी झालेल्या प्रचारसभेत अमित शहा यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे त्यांना विधानसभेत जाण्याची संधी मिळाली. त्याच वेळी या दोन्ही कार्यक्रमांचे आयोजन त्यांच्या उपस्थितीत करण्याचा निर्धार करण्यात आला होता.
खासदार धैर्यशील माने यांनी भाषणात केंद्र सरकारच्या विविध निर्णयांचा उल्लेख करत इचलकरंजी शहरातील पाणीप्रश्न आणि पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सोडविण्याची अपेक्षा व्यक्त केली.
माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांनी भाजप कोल्हापूर जिल्ह्यात रुजवली त्यांचा आमदारकी देऊन योग्य सन्मान करण्याची मागणी केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकार क्षेत्राला नवसंजीवनी देण्यात केंद्र सरकारचे योगदान अधोरेखित केले.कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास १५०० कोटींचा निधी दिला, तसेच महायुती सरकारमध्ये शेतकरी आणि महिलांच्या हिताला प्राधान्य असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजीच्या औद्योगिक आणि सहकार इतिहासाचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, इचलकरंजीमध्ये १९०४ मध्ये पहिला यंत्रमाग सुरू झाला आणि १९१३ मध्ये पहिली सहकारी संस्था सुरू झाली.या सर्व घडामोडीचे साक्षीदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा असून शहराच्या विकासात त्यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.
इचलकरंजी शहराच्या पाणीप्रश्नाबाबत महत्त्वाची घोषणा करताना मुख्यमंत्री म्हणाले की, शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन जुने दानवाड येथून प्रस्तावित योजनेचे सादरीकरण गेल्या आठवड्यात आ.राहुल आवाडे,खा.धैर्यशील माने यांनी केले असून सदर योजनेतून पाणीपुरवठ्यास मंजुरी देण्यात येत आहे. २०५१ पर्यंत आवश्यक पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य सरकार आवश्यक निधी उपलब्ध करून देईल. तसेच शहराच्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी व यंत्रमाग उद्योगास एकाच दराने वीज देण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून वीजपुरवठ्याचा पर्याय विकसित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार धनंजय महाडिक, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,सुरेशराव हाळवणकर,स्वप्नील आवाडे, मौसमी आवाडे, महापौर उदय धातूंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने,शेखर शहा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी आभार मानले.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा