गझल क्षेत्रातील वाटचाल सुरेश भट यांच्या प्रेरणेतूनच झाली-ज्येष्ठ गझलकार प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन
इचलकरंजी ता.१९ वयाची वीस वर्षे पूर्ण होण्यापूर्वी १९८५ सालीच मला समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस आचार्य शांतारामबापू गरुड आणि मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती सुरेश भट उर्फ दादा हे दोघेही भेटले. त्या वेळपासून गेली ४१ वर्षे समाजवादी प्रबोधिनीचा कार्यकर्ता -लेखक -वक्ता -संपादक त्याचबरोबर कवी -गझलकार म्हणूनही माझा समांतर प्रवास झालेला आहे. प्रबोधिनीच्या कामाला पूर्णतः प्राधान्य देत असतानाच गझल लेखनाचा व तिच्या व्यासंगाचा छंद जाणीवपूर्वक जोपासला. त्यातूनच ” एक रविवार : एक गझल ” हा युट्यूबवरील उपक्रम सलग सहा वर्षे करू शकलो. तसाच तो पुढे करत राहण्याची खात्रीही निर्माण झाली आहे. या उपक्रमात रसिकस्रोत्यांसह माझा गझलपरिवार आणि या उपक्रमाच्या सर्व तांत्रिक बाबी सांभाळणारा माझा चिरंजीव प्रत्यूष याचे योगदान मोठे आहे. ही संपूर्ण वाटचाल सुरेश भट यांच्या प्रेरणेतूनच आहे त्याबद्दल त्यांच्या, प्रती मी कृतज्ञ आहे. तसेच या गझलरंगी प्रवासातील सर्वांबद्दल मला अपार आदर आहे अशी भावना ज्येष्ठ गझलकार प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केली. ते ज्येष्ठ गझलकार व गझलसादचे निमंत्रक प्रा.नरहर कुलकर्णी यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत बोलत होते.
प्रसाद कुलकर्णी यांच्या ” एक रविवार : एक गझल ” या उपक्रमाला सहा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आणि गझल सादरीकरणाच्या त्रिशतकीय वाटचालीबद्दल प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था आणि गझलसाद यांच्या संयुक्त विद्यमाने ” गझलरंग ” या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ही मुलाखत फेसबुक लाईव्ह होती.स्वागत, प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेचे प्रमुख प्रशांत जोशी यांनी करून दिला. जाणीव फाउंडेशनच्या सुषमा बटकडली यांच्या हस्ते प्रसाद कुलकर्णी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा. नरहर कुलकर्णी यांनी प्रसाद कुलकर्णी यांना अनेक प्रश्न विचारून बोलते गेले. त्यात प्रसाद कुलकर्णी म्हणाले, सुरेश भटांनी स्वतः गझल लिहीत असताना नव्या पिढीला गझलेची बाराखडी दिली. शेकडो जणांना लिहिते केले. उत्कृष्ट रचना, तंत्रशुद्धता आणि कमीतकमी शब्दात व्यापक आशयघनता ही गझलेची प्रमुख वैशिष्ट्ये असतात. छंदोबद्धता हे गझलेचे व्यवच्छेदक लक्षण आहे. गझल हा कवितेचाच एक प्रकार आहे. आज गझलेची लोकप्रियता, हृदयप्रियता, कर्णप्रियता आणि नयनप्रियताही वाढत आहे याचे मोठे समाधान आहे. माझ्या गझल लेखनाच्या वाटचालीत मला पंडित यशवंत देव यांच्यासह अनेक गायक-गायिका,संगीतकारांनी, रसिकानी दिलेले पाठबळ नेहमीच स्फूर्तीदायक ठरलेले आहे. गझलांकित आणि गझलसाद या माझ्या गझलसंग्रहांच्या नावाने महाराष्ट्रात व कर्नाटकात गझलेचा प्रसार आणि प्रचार करणारे काही मंच उभे राहिले याचाही विशेष आनंद आहे.
प्रसाद कुलकर्णी यांनी विविध प्रश्नांची उत्तरे देताना एक रविवार : एक गझल हा उपक्रम ,गझल लेखनातीला चार दशकांची वाटचाल, या प्रवासातील आठवणी, सुरेश भट यांचे योगदान, गझल लेखनातील सहकारी,मराठी गझलेची आजची स्थिती, गझलच्या कार्यशाळा , पुढील वाटचाल अशा अनेक विषयांवर भाष्य केले. तसेच स्वतःच्या काही रचनाही सादर केल्या. शेवटी प्रशांत जोशी प्रतिज्ञा नाट्य संस्थेच्या वतीने जे सामाजिक कार्य करत आहेत त्याला सहकार्य करण्याचेही आवाहन केले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







