कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचा ३२ वा हंगाम समाप्त.
इचलकरंजी –
हुपरी येथील कलाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा सन २०२४-२५ हा ३२ वा ऊस गाळप हंगाम संस्थापक चेअरमन क‘ाप्पाण्णा आवाडे आणि ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे संपन्न झाला. हंगाम समाप्तीप्रित्यर्थ कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासो चौगुले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सन्मती चौगुले या उभयतांच्या हस्ते श्री सत्यनारायणाची पूजा करण्यात आली. त्याचबरोबर हंगामात उत्पादित झालेल्या साखर पोत्यांचे पूजनही करण्यात आले.
कारखान्याच्या या ३२ व्या ऊस गाळप हंगामाकरीता १५ ऑक्टोबर २०२४ रोजी बॉयलर अग्निप्रदीपन होऊन २६ नोव्हेंबर २०२४ रोजी ऊस गाळपास सुरुवात झाली. कारखान्याने या हंगामामध्ये ९१ दिवसात १३ लाख ५५ हजार ३२८ मे. टन इतके ऊस गाळप केले. या हंगामात कारखान्याकडे १४०६४ हेक्टर इतका ऊस गाळपासाठी आला. चालू हंगामामध्ये हेक्टरी सरासरी ९६ मे. टन इतके ऊस उत्पादन मिळाले, मागील हंगामात ते ९८ मे.टन होते. गाळप हंगाम २०२४-२५ करीता ऊस विकास योजनेतून खते, बि-बियाणे, तणनाशके, सुक्ष्म अन्नद्रव्ये, ठिबक सिंचन, क्षारपड जमीन सुधारणा यासाठी ७ कोटी १८ लाख ४७ हजार इतक्या रकमेचे वाटप केले. त्यामध्ये ५५ लाख ७२ हजार इतके अनुदान दिलेले आहे.
या हंगामातील तोडणी वाहतूकीसाठी २ ट्रक, ३०६ ट्रॅक्टर, ६०२ ट्रॅक्टर टायरगाडी व २८५ बैलगाडी आणि. ७० ऊस तोडणी यंत्रे प्रत्यक्षात कामावर हजर झाले. यामुळे कारखान्यास ऊस पुरवठा होण्यास मदत झाली. ऊस उत्पादक सभासद व शेतकर्यांनी आपला ऊस कारखान्याकडे गाळपास पाठवून सहकार्य केल्याबद्दल शेतकरी-सभासद, तोडणी वाहतूकदार व मजूर आणि अधिकारी-कर्मचारी कामगार यांचे कारखाना व्यवस्थापनाने आभार मानले. पुढील हंगामामध्ये या वर्षापेक्षाहि अधिक ऊस गाळप होण्यासाठी सर्व सभासद व शेतकर्यांनी आपला सर्व ऊस नोंद देऊन गाळपासाठी पाठवावा असे आवाहनही संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडेदादा यांनी यावेळी केले.
कार्यक्रमासाठी कारखान्याचे संचालक, कामगार युनियनचे प्रतिनिधी तसेच इतर मान्यवर व कारखान्याचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800