विधवांना विरांगना संबोधून सन्मानाची वागणुक द्यावी-राष्ट्रसंत कमलमुनीजी कमलेश
मंगळवारी विरांगना सन्मान समारोहाचे आयोजन.
इचलकरंजी
जेव्हा एखादी महिला विधवा होते त्यामध्ये तिचा कसलाही दोष नसतो,परंतु सर्व त्रास व दुजाभाव तिला सहन करावा लागतो.विधवा झाल्यानंतर महिला अडचणींवर मात करत संघर्षातुन आपले कुटुंब चालवते त्यामुळे त्याना समाजात महत्वाचे स्थान मिळाले पाहिजे व विरांगना असे संबोधून सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे असे विचार राष्ट्रसंत कमलमुनीजी कमलेश यांनी पत्रकार परिषदेत मांडले.
मंगळवार ११ मार्च रोजी सर्व समाजातील विरांगना महिलांनी महावीर जैन भवन येथे सकाळी ९.३० वाजता उपस्थित रहावे त्यांचा यथोचित सन्मान श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ इचलकरंजी व श्री अखिल भारतीय श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरस महिला शाखा यांच्या वतीने करण्यात येणार आहे.यासाठी भारतीय जैन दिवाकर विचार मंच नवी दिल्ली चे राष्ट्रीय उपाध्यक्ष महर्षि संत भारत भूषणजी व राष्ट्रीय महिला अध्यक्ष मंगला भंडारी उपस्थित राहणार आहेत.
पुढे बोलताना कमलेशमुनीजी म.साब यांनी विधवांचा विरांगना म्हणून सन्मान केला पाहिजे. शासनाने पशुधनाचे रक्षण केले पाहिजे. गो रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक गो शाळा असली पाहिजे.पशुधन जगले,तरच आपण जगू.शासनाने बोलणे व कृतीमध्ये फरक करू नये असे आवाहन केले.
कमलमुनीजी म्हणाले, सरकार दुहेरी निधीचा अवलंब करीत आहे. विक्रीवर कायदा करण्यापेक्षा उत्पादन बंदीचा कायदा होणे आवश्यक आहे. गो हत्या रोखण्यासाठी मजबूत कायदा झाला पाहिजे. ४० टक्के नकली दूध येत आहे. मंदिरातील प्रसादामध्ये दिसणारी चरबी आपण कसे थांबवू. त्यामुळे धर्मच भ्रष्ट होईल.गायीला फक्त राजमाता म्हणून घोषित करून चालणार नाही,तर एकही गाय रस्त्यावर दिसणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.त्यासाठी नंदी शाळा उभारण्याची आवश्यकता आहे.गाय चरणाऱ्या गायरान भूमीवर अतिक्रमण करणारेही कसाईच आहेत.धार्मिकतेची गोष्ट करणाऱ्या देशातील मांस निर्यातीचे प्रमाण दुप्पट झाले आहे,हा विरोधाभास आहे. ३० लाख संत प्रयागराजमध्ये आले होते. प्रत्येक संतांनी एक गाव दत्तक घेऊन शिक्षण,आरोग्य यावर काम केल्यास देश प्रगतीपथावर जाईल.मंदिरातून बाहेर येऊन मानव सेवेसाठी काम केले पाहिजे.
ते म्हणाले, पतीच्या मृत्यूनंतर पत्नी संघर्ष करते आणि मुला-बाळांचे पालन करते, ही विधवा नसून विरांगना आहे. कोणत्याही धर्माच्या धर्मग्रंथात विधवा या शब्दाचा उल्लेख नाही. सती प्रथेमध्ये सती एकदा जाते; पण पतीच्या मृत्यूनंतर विधवांना धार्मिक कार्यात सहभागी न करून देता त्यांना आपण सतीपेक्षा जास्त हीनतेची वागणूक देत आहोत, हे थांबले पाहिजे. यासाठी आम्ही विरांगनांच्या हस्ते मंगल कलश मिरवणूक,त्यांच्या हस्ते विविध उद्घाटन करणे असे कार्यक्रम घेत आहोत. सर्व संतांनी एकत्र येऊन नशामुक्ती, पर्यावरण, नैतिकता, राष्ट्रीय एकता,अहिंसा यावर काम करण्याची आवश्यकता आहे असे मत व्यक्त केले.प्लास्टिक,दारु,गुटखा यांच्या वापरावर दंड करण्यापेक्षा सरकारने उत्पादनावर बंदी आणावी असेही आवाहन केले.
यावेळी श्री.वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ अध्यक्ष रमेश जैन,माजी अध्यक्ष श्रीकांत चंगेडिया,उपाध्यक्ष राहुल बोरा,सेक्रेटरी जयंतीलाल सालेचा,सहमंत्री घिसुलाल पारख,ट्रस्टी संजय गुगळे,कॉन्फरन्स पदाधिकारी महावीरजी बोरुंदिया, विजयराजजी बोरा,पद्मजा चंगेडिया,वैशाली बोरा उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800