महिला गटात शिवशक्ती, हिंदवी, शिवशाहू, जय हनुमानची आगेकुच,पुरुष गटात नवभारत, बालभारत, जयहिंदची घोडदौड सुरु

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महिला गटात शिवशक्ती, हिंदवी,
शिवशाहू, जय हनुमानची आगेकुच,पुरुष गटात नवभारत, बालभारत, जयहिंदची घोडदौड सुरु

इचलकरंजी:
येथील जयहिंद मंडळाच्या मैदानावर आयोजित कोल्हापूर जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत अत्यंत अटीतटीचे आणि एकतर्फी सामने पाहण्यास मिळत आहेत. बाद पध्दतीने सुरु असलेल्या या स्पर्धेत पुढे जाण्यासाठी सर्वच संघांची धडपड सुरु आहे. त्यामध्ये नवभारत शिरोली, बालभारत इचलकरंजी आणि जयहिंद इचलकरंजी यांनी एकतर्फी विजय प्राप्त केला. तर महिला गटातील लढतीत शिवशक्ती हुपरी, हिंदवी कौलव, शिवशाहू चिखली, जय हनुमान बाचणी यांनी संघांनी प्रतिस्पर्धी संघांना नमविले.
जयहिंद मंडळाच्या वतीने मंडळाचे संस्थापक संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू स्व. मल्हारपंत बावचकर (मामा) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कोल्हापूर जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील संघ सहभागी झाले आहे. सायंकाळच्या सत्रात होत असलेली स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडा रसिकांची गर्दी होत आहे.
आमदार सतेज पाटील, माजी आमदार राजीव आवळे, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने, पुंडलिक जाधव, शामराव कुलकर्णी आदी मान्यवरांच्या हस्ते पुरुष गटातील सामन्यांचा शुभारंभ करण्यात आला. तर महिला दिनाचे औचित्य साधत महिला गटातील सामन्यांचा शुभारंभ महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, आमदार राहुल आवाडे, श्रृती जमदग्नी, श्रध्दा बाळण्णावर  व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सतिश डाळ्या, शशांक बावचकर, राहुल खंजिरे, उदय चव्हाण, दिलीप ढोकळे, शेखर शहा, शंकर पोवार आदींसह मंडळाचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
महिला गटात शिवशक्ती हुपरी (29) विरुध्द महालक्ष्मी कोल्हापूर (19) हा रंगतदार सामना शिवशक्तीने 10 गुणांनी जिंकला. हिंदवी कौलव विरुध्द डायनॅमिक इचलकरंजी हा सामना तसा एकतर्फीच झाला. हिंदवीच्या खेळाडूंनी आक्रमक खेळी करताना डायनॅमिकवर 15 गुणांनी मात केली. न्यु स्वराज्य हुपरी विरुध्द शिवशाहू चिखली यांच्यातील सामन्यात 26-14 अशा गुण फरकाने शिवशाहू संघ विजयी ठरला. तर जय हनुमान बाचणी विरुध्द जय किसान वडगणे यांच्यातील सामनाही एकतर्फी होऊन त्यामध्ये बाचणी संघाने (36) वडणगे संघांवर (18) 18 गुणांनी मात केली.
पुरुष गटात राष्ट्रसेवा दल कुरुंदवाड विरुध्द शिवशंभो तळसंदे यांच्यातील सामना तसा चुरशीचा झाला. अखेर राष्ट्रसेवा दल संघाने शिवशंभो संघावर 21-10 अशा फरकाने विजय मिळविला. शिवशाहू सडोली विरुध्द वारणाखोरा कोडोली यांच्यातील लढत वारणाखोरा संघाने 27-10 अशा गुणांनी जिंकली. नवभारत कोरोची विरुध्द नवभारत शिरोली यांच्यातील सामना हा एकतर्फीच झाला. सुरुवातीपासून शिरोली संघाने सामन्यावर पकड ठेवली होती. दोन्ही डावात आक्रमक खेळी करत शिरोली संघाने 45 गुणांची कमाई करत कोरोची (14 गुण) संघाचा 31 गुणांनी पराभव केला. जयकिसान वडणगे विरुध्द हेरले क्रीडा मंडळ यांच्यातील सामना वडणगे संघाने 9 गुणांनी जिंकला. वडगणे संघाला 25 तर हेरले मंडळाला 16 गुण मिळाले. छावा शिरोली विरुध्द जय हनुमान बाचणी यांच्यातील सामनाही चांगलाच रंगला. अखेर शिरोली संघाने हा सामना 17 गुणांनी जिंकला.
बालभारत इचलकरंजी विरुध्द युवक संघटना पट्टणकोडोली यांच्यातील लढत ही तशी एकतर्फीच झाली. बालभारतच्या खेळाडूंनी प्रारंभापासून आक्रमक चढाया आणि मजबूत पकड करत सामन्याचे पारडे आपल्याच बाजूला ठेवले. आणि 39 विरुध्द 14 असे गुण मिळवून 25 गुणांनी विजय प्राप्त केला. तर जयहिंद इचलकरंजी विरुध्द युवा आणाजे यांच्यातील सामना पूर्णत: एकतर्फी होता. जयहिंदच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्धी संघाला फारशी संधी न देता सामान्यावर मजबूत पकड ठेवली. जयहिंद ने 36 गुण मिळविताना आणाजे संघाला केवळ 7 गुण मिळाले आणि जयहिंदने ही लढत 21 गुणांनी जिंकली.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More