किशोर गटात धाराशिव, कोल्हापूर तर किशोरी गटात सोलापूर व सांगली जिल्हा संघाची आगेकूच

इचलकरंजी:
इचलकरंजी येथे राज्य शासनाच्या कै.भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेला सोमवारी प्रारंभ झाला. सकाळच्या सत्रात दहा साखळी सामने पार पडले. त्यामध्ये महिला गटात धाराशिव, ठाणे, नागपूर नाशिक तर पुरुष गटात पुणे जिल्हा संघांनी त्याचबरोबर किशोर गटात धाराशिव, कोल्हापूर आणि किशोरी गटात सोलापूर व सांगली जिल्हा संघानी विजयी सलामी देत आपली घोडदौड सुरु केली.
या स्पर्धेत खुला पुरुष व महिला गट तसेच किशोर व किशोरी वयोगटातील एकूण 40 संघांचा समावेश असून पुरुष व महिला संघांची अ, ब, क आणि ड या चार गटात विभागणी केली असून प्रत्येक गटात 3 संघ आहेत. तर किशोर व किशोरी गटासाठी अ आणि ब असे प्रत्येकी दोन गट करण्यात आले असून प्रत्येक गटात 4 संघांचा समावेश आहे.
किशोर विभाग :- अ गट : धाराशिव, पुणे, सांगली, नागपूर. ब गट : ठाणे, सातारा, कोल्हापूर, बुलढाणा. किशोरी विभाग :- अ गट : सोलापूर, पुणे, ठाणे, नागपूर. ब गट : धाराशिव, सांगली, कोल्हापूर, बुलढाणा.
पुरुष विभाग :- अ गट : पुणे, ठाणे, नागपूर. ब गट : मुंबई उपनगर, अहिल्यानगर, गडचिरोली. क गट : सांगली, सोलापूर, अमरावती. ड गट : धाराशिव, मुंबई, कोल्हापूर. महिला विभाग :- अ गट : धाराशिव, मुंबई, अमरावती. ब गट : सांगली, ठाणे, अकोला. क गट : पुणे, सोलापूर, नागपूर. ड गट : नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर.
सकाळच्या सत्रात झालेल्या पुरुष अ गटातील पुणे विरुद्ध नागपूर हा सामना पुणे संघाने 8 गुणांनी जिंकला. तर क गटातील सांगली विरुद्ध सोलापूर संघातील सामना 26-26 गुणसंख्येत बरोबरीत सुटला. महिला विभागातील अ गटातील धाराशिव विरुद्ध अमरावती सामना धाराशिव संघाने 1 डाव 4 गुणांनी विजय मिळविला. ब गटातील अकोला विरुद्ध ठाणे या सामन्यात ठाणे जिल्ह्याने 1 डाव 7 गुणांनी विजय प्राप्त केला. क गटातील पुणे विरुद्ध नागपूर या सामन्यात नागपूर संघाने 1 डाव 9 गुणांनी विजय मिळविला. ड गटातील नाशिक विरुद्ध रत्नागिरी हा सामना नाशिक जिल्हा संघाने 1 डाव तीन गुणांनी जिंकला.
किशोर अ गटात धाराशिव विरुद्ध नागपूर यांच्यातील सामन्यात धाराशिवने 1 डाव 11 गुणांनी विजय मिळविला. ब गटातील कोल्हापूर विरुद्ध बुलढाणा यांच्यातील सामना कोल्हापूरने 1 डाव 12 गुणांनी जिंकला. किशोरी अ गटातील नागपूर विरुद्ध सोलापूर यांच्यातील सामना सोलापूरने 2 गुण व 1 मिनिटे 30 सेकंद राखून जिंकला. ब गटामध्ये असणार्या बुलढाणा विरुद्ध सांगली यांच्यातील सामन्यात सांगलीने 1 डाव 4 गुणांनी विजय प्राप्त केला.
मंगळवारी दोन्ही सत्रात साखळी सामने होतील तर बुधवारी सकाळच्या सत्रात साखळी सामने होतील. बुधवार संध्याकाळपासून उपांत्य फेरीच्या सामन्यांना सुरुवात होईल. गुरुवारी सकाळच्या सत्रात तृतीय क्रमांकाचे सामने तर संध्याकाळच्या सत्रात उपांत्य व अंतिम फेरीचे सामने होतील.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800