डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजनेंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांची घरकुले युद्ध पातळीवर पुर्ण करणेत येणार:-आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील
इचलकरंजी:
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांचे विशिष्ट प्रकारचे काम विचारात घेऊन ज्या सफाई कर्मचाऱ्यांची सेवा २५ वर्षे किंवा त्याहून जास्त झालेली आहे अशा सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर किंवा सफाई कर्मचारी सेवेत असताना त्याचा मृत्यू झाल्यास अशा सफाई कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना मालकी तत्त्वावर मोफत सदनिका देणे बाबत नगर विकास विभागाकडून शासन निर्णय झालेला आहे.
या शासन निर्णयाची अंमलबजावणी साठी तत्कालीन इचलकरंजी नगरपरिषद व सध्याचे महानगर पालिका प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत आहे .या योजनेअंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काने २६९ चौ. फु. चटई क्षेत्राच्या सदनिका मोफत वाटप करता याव्यात यासाठी प्रशासकीय स्तरावरून लाभार्थी संख्या निश्चित केलेली आहे. अशा पात्र १४३ सफाई कर्मचाऱ्यांना अथवा त्यांचे वारसांना सदनिका देणे करिता शहरातील महानगरपालिका मालकीच्या काही जागा निश्चित केलेल्या आहेत . याकरिता महानगरपालिकेकडून दि. ८ डिसेंबर 2023 रोजी ठराव पारित केलेला आहे. यामध्ये लालनगर कामगार चाळ, न्यायालयासमोरील महानगरपालिका सदनिकांची जागा तसेच कोल्हापूर रोडवरील कामगार चाळ इत्यादी ठिकाणी या योजनेअंतर्गत सदनिका बांधणी बाबतचा निर्णय घेतलेला होता. याकामी पिनाका कन्सल्टंट,सांगली यांना सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) करण्याचे काम सोपविण्यात आलेले होते. त्याप्रमाणे विविध जागांची पडताळणी केले अंती
पिनाका कन्सल्टन्सी यांनी कोल्हापूर रोडवरील कामगार चाळ परिसर येथे जुन्या इमारती पाडून या योजनेअंतर्गत महानगरपालिके कडील पात्र लाभार्थ्यांना सदनिका बांधून देणे बाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) महानगर पालिकेकडे सादर केलेला आहे.
सदर अहवालाची पडताळणी महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून करण्यात येत असून महानगरपालिकेतील पात्र लाभार्थ्यांची संख्या विचारात घेऊन तसेच कामगार चाळ परिसरात उपलब्ध होणारी जागा विचारात घेऊन G + 3 या पद्धतीने २१६ सदनिकेचे बांधकाम करणेबाबतचा प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या कामी कामगार संघटनेचे पदाधिकारी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. पिनाका कन्सल्टन्सी यांनी तयार केलेला प्रकल्प अहवाल व संकल्प चित्राप्रमाणे इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करून पूर्ण करण्याच्या दृष्टीने याकामी आवश्यक प्रशासकीय व वित्तीय मान्यता प्राप्त करण्याची कार्यवाही आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी तातडीने सुरू केलेली आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800