सीसीटीव्ही लोकार्पण कार्यक्रमात राहुल आवाडे आक्रमक,जिल्हा शल्यचिकित्सक धारेवर,तातडीने डॉक्टर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन.
इचलकरंजी:
येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक योजनेअंतर्गत ६५ लाख रुपयांच्या निधीतून बसविण्यात आलेल्या सीसीटिव्ही योजनेचा शुभारंभ आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. याठिकाणी बुलेट ५५, डोम ९७ आणि हंडी १ अशा प्रकारचे एकूण १५३ कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
दरम्यान, आधीच कमी स्टाफ असताना येथील डॉक्टरांना अन्य रुग्णालयात पाठविल्याने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील रुग्णांची होत असलेली हेळसांड आणि औषधासाठी ४५ लाख रुपये मंजूर असतानाही ते अद्याप न मिळाल्यासह रुग्णालयात हलगर्जीपणा दिसत असल्याचा आरोप करत आमदार राहुल आवाडे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत धारेवर धरले. अखेर डॉ. देशमुख यांनी बाहेर पाठविण्यात आलेल्या डॉक्टरांचे आदेश रद्द करण्याचे आश्वासन देत अन्य स्टाफच्या नेमणुकीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.
इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय हे सर्व सोयी-सुविधांनीयुक्त होत असून याठिकाणी अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित केली जात आहे. त्याच अनुषंगाने रुग्णालयात अपघात, आत्महत्या, खून यासारख्या गंभीर घटनांमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. पोलिस चौकी असली तरी त्याठिकाणी कर्मचारी उपलब्ध नसल्याने सुरक्षा व्यवस्थेत अडथळे निर्माण होत होते. हे सर्व टाळण्याच्या दृष्टीने आमदार राहुल आवाडे यांनी जिल्हा नियोजन समितीकडे पाठपुरावा केला होता. आता नव्या सीसीटीव्ही प्रणालीमुळे घटनांवर नियंत्रण ठेवण्यासह वादविवाद, धूम्रपान, अनुचित प्रकार अथवा वर्तन या गोष्टींना आळा घालण्यासह त्वरित कारवाई करणे शक्य होणार आहे.
यावेळी आमदार आवाडे यांनी, सार्वजनिक आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि सुरक्षित बनवण्यास आपले प्राधान्य आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णालय प्रशासनासोबत नागरिकांनाही विश्वासार्हता मिळेल. त्यामुळे रुग्णालयातील कार्यपद्धती अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध बनेल, असे सांगितले.
हे कॅमेरे रुग्णालयाच्या प्रवेशद्वार, वॉर्ड, ओपीडी, शस्त्रक्रिया विभाग, औषध वितरण केंद्र, पार्किंग अशा प्रमुख ठिकाणी बसवले गेले आहेत. याद्वारे स्वतंत्र नियंत्रण कक्षातून संपूर्ण परिसरावर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाग्यरेखा पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित सोहनी, प्रशासकीय अधिकारी राजेश पाटील, दीपक सुर्वे, राजू बोंद्रे, प्रमोद पोवार, रुग्णालय कल्याण समिती सदस्य कपिल शेटके, विजय पाटील, तसेच इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800