अंगणवाडी सेविका-मदतनिसांच्या समस्यांचे इचलकरंजी प्रकल्प कार्यालयात निवेदन इचलकरंजी :
अंगणवाडी सेविका व मदतनिसांना कामाच्या ठिकाणी भेडसावणाऱ्या अडचणी तातडीने सोडवाव्यात, या मागणीसाठी ‘पूर्व प्राथमिक सेविका व अंगणवाडी कर्मचारी महासंघा’च्या वतीने इचलकरंजी प्रकल्प कार्यालयात भव्य निवेदन सादर करण्यात आले. अंगणवाड्यांच्या कामकाजात तांत्रिक अडचणी, मानधनाच्या विलंबासह सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून, शासनाने याबाबत त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी सेविका-मदतनिसांनी केली.
अंगणवाडीत लाभार्थ्यांसाठी वाटण्यात येणाऱ्या टीएचआरसाठी एफआरएस प्रणालीमध्ये सातत्याने तांत्रिक अडचणी येतात. नेटसंपर्काचा अभाव व सिस्टममधील त्रुटींमुळे कामात अडथळे निर्माण होतात, यामुळे कर्मचाऱ्यांवर अनावश्यक मानसिक ताण येतो. त्यावर तोडगा निघेपर्यंत जबरदस्तीने कामाचा ताण देऊ नये, अशी मागणी निवेदनात स्पष्टपणे मांडण्यात आली आहे.
याशिवाय, इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही उन्हाळ्याच्या सुट्टीत (१ मे ते ३१ मे) अंगणवाड्या बंद ठेवून सेविका-मदतनिसांना एकत्रित सुट्टी द्यावी, तसेच थकीत असलेले मार्च महिन्याचे मानधन तातडीने अदा करावे, यावर भर देण्यात आला.
हे निवेदन मुख्य सेविका सौ. शारदा जाधव मॅडम यांनी स्वीकारले. यावेळी रेखा कांबळे, पुष्पलता जाधव, शिला पंढरपूरे, राजश्री चव्हाण, संजीवनी खोत, उज्वला कोळी, सवर्णां रवण्दे यांच्यासह असंख्य सेविका व मदतनीस उपस्थित होत्या. नेतृत्व कॉ. सुनिल बारवाडे यांनी केले. मागण्या मान्य न झाल्यास लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800