चिन्मयी सुमीत यांची बहारदार मुलाखत
इचलकरंजी –
शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी आपटे वाचन मंदिराच्या ५३ व्या वसंत व्याख्यानमालेत संवेदनशील अभिनेत्रीशी संवाद साधताना चिन्मयी सुमती यांनी संस्कार म्हणजे गुटी नाही, तर आई-वडील जगतात, त्यातूनच मुले शिकतात. काम केल्यासारखे कधीच दाखवू नका, तर काम करुन दाखवा, अभिनय म्हणजे आपल्याच अवतीभवतीचा अनुभव स्वतःच्या हृदयातून जगणे असते असे मत त्यांनी मुलाखत देताना व्यक्त केले. संस्थेच्या उपाध्यक्ष हर्षदा मराठे यांनी त्यांची मुलाखत घेतली.
यावेळी त्यांनी नाटक, सिनेमा, मालिकांमधून विविध भूमिका साकारलेल्या चिन्मयी सुमीत यांनी, अभिनय म्हणजे नुसते संवाद म्हणणे नव्हे, तर भावनिक सचोटीने व्यक्त होणे असते असे सांगून नाटक, चित्रपट, मालिका या प्रत्येक माध्यमांची बलस्थाने आणि महत्त्वही वेगळे आहे. नाटक नटाचे माध्यम आहे, तर सिनेमा दिग्दर्शकाचे माध्यम आहे. मी व्यावसायिक नाही, तर हौशी अभिनेत्री आहे. मनाला वाटले तर ती भूमिका साकारते आणि ती दिग्दर्शक व लेखक यावर अवलंबून असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी अस्तित्व या नाटकातील चार भिंतीच्या पलीकडील सफाई कामगाराच्या जीवनाची विवंचना, तर मुरांबा यांसह अनेक चित्रपटांतील भूमिकांबाबत सांगितले.
घरातूनच साहित्य आणि कलेचे बाळकडू मिळाले, पण त्या बळावर न विसंबता स्वत ची स्वतंत्र वाट शोधल्याचा त्यांनी उल्लेख केला. सर्जनशील वारसा मिळतो तो सांभाळणे आणि स्वतः चे अस्तित्व निर्माण करणे ही खऱ्या कलाकाराची खरी कसोटी असते. अभिनयातील बदलती भाषा, डिजिटल माध्यमांचा प्रभाव, समाजाशी कलाकराचे नाते, मानसिक आरोग्य, लेखक आणि दिग्दर्शक यांच्याशी नाते या बाबींवरही सविस्तर चर्चा झाली. मुलाखती दरम्यान चिन्मयी सुमीत यांनी आपली दोन्ही मुले मराठी शाळेत शिकल्याची बाब अभिमानाने सांगितली. तसेच मराठी शाळांची सदिच्छा दूत म्हणून खेड्यापाड्यात काम करत असल्याचेही सांगितले. कलाकरांच्या मनोविश्वात डोकावून पाहण्याची आणि त्यातून स्वत चे आयुष्य समजून घेण्याची संधी शोधावी. यावेळी त्यांनी आंबेजोगाईतील शोभायात्रेचा अनुभव व अरुणा शानभाग या दोन्हीचे आलेले अनुभव त्यांनी यावेळी सांगितले. सुमीत राघवन आणि त्यांचे प्रेम कसे जुळले यावर ही त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या, किस्से सांगितले. या मुलाखतीतून त्यांनी आपल्या अभिनय व जीवन प्रवासाचा हृदयस्पर्शी वेध घेतला.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीपूजना नंतर पाहुण्यांचे स्वागत संस्थेच्या अध्यक्ष सौ. सुषमा दातार यांनी केले. श्यामसुंदर मर्दा, गिरीश कुलकर्णी, अरुण भंडारे व माधवी भंडारे या प्रायोजकांचे पाहुण्यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पाहुण्यांची ओळख संस्थेच्या उपाध्यक्ष हर्षदा मराठे यांनी करुन दिली. आभारप्रदर्शन संस्थेच्या कार्यवाह माया कुलकर्णी यांनी केले. डीकेटीई संस्थेच्या पटांगणात झालेल्या या मुलाखतीस श्रोत्यांनी उदंड प्रतिसाद दिला.
याप्रसंगी डॉ. अशोकराव सौंदत्तीकर, संस्थेचे पदाधिकारी, संचालक, मान्यवर व्यक्ती तसेच इचलकरंजीतील रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800