उद्योजिका होण्यासाठी आपल्या महिला सक्षम-सौ अरुंधती महाडिक
इचलकरंजी दि. १० मे- “आपल्याकडील उद्योग व्यवसाय करणाऱ्या महिला या स्वतःचे घर चांगल्या प्रकारे सांभाळून कार्य करीत असतात. घरातील व्यवस्थापन कौशल्यामुळे उद्योग व्यवसायात देखील त्या उत्तम कार्य करतात. त्यामुळे यशस्वी उद्योजिका होण्यात आपल्या महिला सक्षम आहेत” अशा आशयाचे विचार येथील महिला उद्योजक मेळाव्याच्या भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी व्यक्त केले. येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल, इचलकरंजी महानगरपालिका आणि रोटरी क्लब सेंट्रल ॲनस् कमिटी यांच्यावतीने सदरचा महिला उद्योजक मेळावा आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्या या नात्याने बोलताना इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त व प्रशासक पल्लवी पाटील यांनी “इचलकरंजी शहरात संस्थान काळापासून चांगली उद्योग परंपरा असून आज महिला देखील ही परंपरा चांगल्या प्रकारे जोपासत आहेत हे कौतुकास्पद आहे” अशा प्रकारचे उदगार काढले. मेळाव्याच्या मार्गदर्शक पाहुण्या या नात्याने भागीरथी महिला संस्था, कोल्हापूरच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक उपस्थित होत्या. यावेळी बोलताना त्यांनी “घरी काम करताना येणाऱ्या वैयक्तिक अडचणींवर मात करून महिला चांगल्या प्रकारे उद्योग करताना दिसतात. महिलांनी समूहाने हे कार्य केल्यास आणि आपल्या कोषातून बाहेर पडून वाटचाल केल्यास त्या अधिक प्रगती करू शकतील” अशा आशयाचे प्रतिपादन केले. त्यापूर्वी सर्व पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
मेळाव्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्राचे प्रतिनिधी सौ. शितल माळी आणि प्रज्वल कणसे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या उद्योग व्यवसाय विषयक विविध योजनांची माहिती चांगल्या प्रकारे दिली. याप्रसंगी युवा उद्योजक वक्ते आणि स्टार्टअप प्रशिक्षक पुष्कर कर्नावट, मुंबई यांनी उद्योग आणि व्यवसाय वाढीसाठी उपयुक्त मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी “महिलांनी उद्योग व्यवसाय करताना त्याच्या वाढीसाठी मार्केट रिसर्च, गुणवत्ता व दर्जा, ग्राहकांशी नाते, अशा सर्व गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. तसेच व्यवसायात स्पर्धा असेल तर आपल्या उद्योगाला अधिक चालना मिळते याचे भान ठेवून कार्य करावे.” असे उदगार काढले.
नंतरच्या सत्रात उपाध्ये सुईंग मशीन कंपनीचे शितल उपाध्ये यांनी मनोगत व्यक्त करताना, महिला उद्योजकांसाठी त्यांच्या विविध योजनांची व उत्पादनांची माहिती दिली. यावेळी त्यांच्या इंडस्ट्रियल सुईंग मशिनचे उदघाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे कर्ज विभागाचे प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी अर्थसहाय्य आणि विविध आर्थिक योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कमिटी चेअरमन अंबरीश सारडा यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले तर प्रेसिडेंट सतीश पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सेक्रेटरी नागेश दिवटे व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी ॲनस् कमिटी चेअरमन सौ. सायली होगाडे यांनी आभार मानले.
येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमास इचलकरंजी व परिसरातील उद्योजक आणि व्यवसायिक महिला तसेच महिला बचत गटांच्या प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
फोटो-महिला उद्योजक मेळावा उदघाटन प्रसंगी सौ.अरुंधती महाडिक, पल्लवी पाटील आणि मार्गदर्शक व संयोजक.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800