ग्रंथ महोत्सवाची प्रेरणा आपटे वाचन मंदिरातूनच-विकास खारगे. आपटे वाचन मंदिरात सत्कार
इचलकरंजी :
इचलकरंजीचे सुपुत्र व महाराष्ट्र शासनाचे महसूल खात्याचे अपर मुख्य सचिव मा. श्री. विकास खारगे यांनी आपटे वाचन मंदिरास सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी ग्रंथालयाच्या वतीने त्यांचा शाल, ग्रंथ भेट व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
आपल्या मनोगतात श्री. खारगे यांनी सांगितले की, “जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचन हा महत्त्वाचा मार्ग आहे. आयएएस परीक्षेच्या काळात मी या ग्रंथालयात वृत्तपत्र विभागात वाचनासाठी येत असे. यामुळे माझे व्यक्तिमत्त्व घडले. जिल्हाधिकारी असताना ग्रंथ महोत्सव आयोजित करण्याची प्रेरणा याच ठिकाणाहून मिळाली.”
ते पुढे म्हणाले की, आपटे वाचन मंदिर हे परिसराचे सांस्कृतिक मातृकेंद्र आहे. विद्यार्थ्यांनी या ग्रंथालयाचा अधिकाधिक उपयोग करून घ्यावा व वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी ग्रंथालयाने विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
Advt
या कार्यक्रमास अध्यक्ष सौ. सुषमा दातार, उपाध्यक्ष काशिनाथ जगदाळे, कार्यवाह प्रा. मोहन पुजारी, सहकार्यवाह डॉ. सुजित सौंदत्तीकर, संचालक ॲड. स्वानंद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागताध्यक्ष सौ. सुषमा दातार यांनी केले, सन्मानपत्राचे वाचन ॲड. स्वानंद कुलकर्णी यांनी केले. प्रा. मोहन पुजारी यांनी आभार मानले, तर सूत्रसंचालन संचालक मीनाक्षी तंगडी यांनी केले.
कार्यक्रमास वाचनप्रेमी सभासद, हितचिंतक, देणगीदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकास खारगे यांचा सन्मान करताना सुषमा दातार,स्वानंद कुलकर्णी, सुजित सौंदत्तीकर,मीनाक्षी तंगडी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







