इचलकरंजी महानगरपालिकेत दोन कर्मचारी कार्यमुक्त : बीजभांडवल गैरव्यवहार व लाच मागणीप्रकरणी तात्काळ कारवाई
इचलकरंजी –
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेंतर्गत महिला स्वयंसहायता बचत गटांना वाटप करण्यात आलेल्या बीजभांडवल प्रकरणी गैरप्रकार झाल्याचा आरोप सिद्ध झाल्याने शहर अभियान व्यवस्थापन कक्षातील रमजान नदाफ यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. तसेच, बांधकाम विभागातील शिकाऊ उमेदवार अब्दुलमुक्षित हिप्परगे याने शौचालय बांधकामासाठी अंदाजपत्रक तयार करून देण्याच्या मोबदल्यात लाच मागितल्याच्या आरोपामुळे त्यालाही तात्काळ सेवा समाप्त करण्यात आली आहे.
ADvt
या प्रकरणी नजीर तहसीलदार यांनी तक्रार दाखल केली होती. तसेच प्रगती संस्था व महिलांच्या निवेदनांच्या आधारावर उपायुक्त विद्या कदम यांच्या नेतृत्वाखाली चौकशी झाली. तपासात रमजान नदाफ यांनी महिलांकडून बीजभांडवल वाटप प्रक्रियेसाठी रोखीने रक्कम स्वीकारल्याचे उघड झाले. परिणामी, आयुक्त पल्लवी पाटील यांच्या आदेशानुसार नदाफ यांना ६ ऑगस्टपासून कार्यमुक्त करण्यात आले. या तपासात समाज विकास अधिकारी सुनील शिंदे यांचे सहकार्य लाभले.
दरम्यान, दुसऱ्या प्रकरणात बांधकाम विभागातील शिकाऊ उमेदवार अब्दुलमुक्षित हिप्परगे याच्याविरोधात मक्तेदार सुशांत कोटगी यांनी तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीचे गांभीर्य ओळखून अति.आयुक्त सुषमा शिंदे यांनी त्यालाही तात्काळ सेवा समाप्तीचे आदेश दिले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







