“संघ गंगा के तीन भगीरथ” नाटकाने प्रेक्षकांची जिंकली मने
इचलकरंजी:
राधिका क्रिएशन्स नागपूर-पुणे आणि विश्वराज रिस्पॉन्सिबल रिव्होल्युशन्स प्रस्तुत “संघ गंगा के तीन भगीरथ” या हिंदी नाटकाचे सादरीकरण श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाले. या नाटकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले तीन सरसंघचालक, डॉ. केशव बळीराम हेडगेवार, माधव गोळवलकर (गुरुजी) आणि बाळासाहेब देवरस यांच्या कार्यकाळातील महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना, त्यांचे त्यागमय जीवन आणि राष्ट्रासाठीचे योगदान हृदयस्पर्शी शैलीत उलगडण्यात आले.
नाटकात डॉ. हेडगेवारांचे बालपण, महात्मा गांधींसोबतची ऐतिहासिक भेट, गुरुजींची साधना, सरदार पटेल व गुरुजींचा संवाद, काश्मीर प्रश्नावरील भूमिका, संघावर लादलेली बंदी, बाळासाहेब देवरसांचे भाषण, आणीबाणीतील सत्याग्रह, रामजन्मभूमी आंदोलन अशा अनेक टप्प्यांतून संघाचा शंभर वर्षांचा कालखंड प्रभावीपणे साकारला गेला.
Advt
नाटकातील दृश्यरचना, घडामोडींचे सादरीकरण आणि संवादांनी उपस्थित प्रत्येक प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले. प्रेक्षकांनी अनेक प्रसंगांना टाळ्यांनी दाद दिली. विशेषतः ‘कार्य मग्न जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती’ हा मंत्र अनेकांच्या अंत:करणाला भिडला.
हे नाटक केवळ नाट्यप्रयोग न राहता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मूल्यांची, कार्यपद्धतीची आणि भारतमातेसाठी समर्पित जीवनाची जिवंत अनुभूती देणारा एक सशक्त दस्तऐवज ठरला. संघशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर हे नाट्यप्रयोग कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा ठरला आहे.
नाटकाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि भारतमाता पूजनाने झाली. या वेळी संघाचे विभाग सहसंघचालक भगतराम छाबडा, तालुका संघचालक रमेश लाहोटी, ज्येष्ठ स्वयंसेवक दत्तोपंत जोशी, जिल्हा कार्यवाह डॉ. राजेश पवार, आर्य चाणक्य पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र राशिनकर, संस्थापक अध्यक्ष जवाहर छाबडा, लोककल्याण मंडळाचे अध्यक्ष अरविंद कुलकर्णी आणि प्रांत कार्यकर्ते श्रीकांत प्रभुदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन नरोत्तम लाटा यांनी केले.
नाटकातील एक प्रसंग
उपस्थित प्रेक्षक वर्ग
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








