ई-बस स्थानकाचे काम संथगतीने; कामास गती द्या – भाजपचे उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांची आयुक्तांकडे मागणी
इचलकरंजी:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्टअंतर्गत केंद्र शासनाच्या “पी.एम.ई-बस सेवा” योजनेतून इचलकरंजी शहरासाठी सुमारे वीस ई-बस मंजूर झाल्या असून, या बससेवेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी सोलगे मळा येथे ई-बस स्थानक उभारण्यात येत आहे. मात्र या कामाला अत्यंत संथगती असल्याने भाजपा उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
Advt
सोलगे मळ्यामधील प्रस्तावित स्थानकासाठी सुमारे ५ कोटी १० लाख रुपयांच्या अंदाजपत्रकातून जागा निश्चित करण्यात आली आहे. टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन १४ ऑक्टोबर २०२४ रोजी मक्तेदाराला कार्यादेश देण्यात आला होता. सुरुवातीला स्थानक परिसरात कंपाऊंडचे काम वेगाने झाले असले तरी त्यानंतर कामाचा वेग प्रचंड मंदावल्याचे निदर्शनास येत आहे. सध्या छत उभारणी, चार्जिंग स्टेशन, प्रवासी सुविधांचे नियोजन अशा अनेक बाबी प्रलंबित आहेत.
या प्रकल्पासाठी एकूण १२ महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र त्यातील आता फक्त दोनच महिने शिल्लक राहिले आहेत. अशा परिस्थितीत काम वेळेत पूर्ण होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याबाबत बोलताना दाभोळे यांनी सांगितले की, “संबंधित मक्तेदाराकडून वेळेत व दर्जेदार काम होण्यासाठी आयुक्तांनी वैयक्तिक लक्ष देणे आवश्यक आहे. शहरवासीयांना लवकरात लवकर पीएम ई बस सेवेचा लाभ मिळावा, हीच आमची अपेक्षा आहे.”
दरम्यान, या सेवेसाठी चालक ठेकेदार पुरविणार असून वाहक महानगरपालिकेमार्फत नियुक्त करण्यात येणार आहेत. त्यामुळे या बाबींची तयारीही आतापासूनच सुरू करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
संथगतीने सुरू असलेले इ बस स्थानकाचे काम
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







